बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार कर्जत-जामखेड मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. परंतू मी जिथे जाईन तिथून उभा राहीन का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत-जामखेड मधून मी उभा राहणार असल्याची चर्चा सुरु असल्याचे रोहित पवार यांनी मान्य केले. परंतु राज्यात अनेक ठिकाणी सध्या मी फिरत असून जिथे जाईन तिथे उभा राहीन का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

रोहित पवार यांच्या हस्ते आज बीडमधील दुष्काळग्रस्त भागांना पाण्याचे टँकर देण्यात आले. समाधानकारक पाऊस होत नाही तोवर टँकर पुरवणे सुरु राहणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे. हे टँकर्स बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित यांनी शरद पवारांसोबत बीड जिल्ह्यात दुष्काळ पाहणीदौरा केला होता.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दारुण पराभवाबाबत रोहित म्हणाले की, निवडणुकीचा जो निकाल लागला आहे तो अनपेक्षित आहे. आम्ही आणि साहेबांनी (शरद पवार) तो निकाल स्वीकारला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही अजून ताकदीनिशी लढणार आहोत.