Sushma Andhare vs Gulabrao Patil: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना 'नटी' म्हणत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे.


मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा उल्लेख करत त्या वसारलेलं भांडं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे राज्यभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून मंत्र्यांनी महिलांबद्दल अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे निषेधार्ह बाब आहे. त्यामुळे बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटातर्फे जळगावात मोर्चा काढण्यात आला. तसेच पोलीस ठाण्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. 


मंत्र्यांचा निषेध म्हणून आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या महापौर तसेच इतर महिला पदाधिकारी या काळ्या साड्या घालून आल्या आहेत. तसेच काही कार्यकर्ते हे सुद्धा काळ्या रंगाचा शर्ट घालून आंदोलनात सहभागी असल्याचा पाहायला मिळालं. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालून पोलिसात तक्रार दाखल करून मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोरदार घोषणाबाजी करून यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेधही व्यक्त करण्यात आला.


मंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीही महिलेबद्दल अपशब्द वापरले होते. सुषमा अंधारे यांच्या जिल्हाभरात सभा झाल्या मात्र त्यांनी कुणाबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही. गुलाबराव पाटील यांनी केलेले वक्तव्य संपूर्ण देशभरातील महिलांचा अपमान आहे. त्यांनी सुषमा अंधारे यांची माफी मागावी तसेच पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे, मात्र ते सत्ताधारी असल्याने पोलिसांवरही त्यांचा दबाव असल्याचा आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 


मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे, असं ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी ॲड.ललिता पाटील यांनी म्हटलं आहे. 


हे देखील वाचा