मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक ट्वीट करत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचे संकेत दिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबत एक छायाचित्र पोस्ट केले आहे. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीसह पवार कुटुंबालाही मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंचे हे ट्वीट खूप काही बोलून जाते.


महाविकासआघाडी सरकारस्थापनेचा दावा करण्याआधीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या या निर्णयामुळं राष्ट्रवादीसह पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर काल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना माघारी ये, अशी विनंतीही केली होती. मात्र, अजित पवारांच्या आजच्या ट्वीटवरुन ते माघारी न येण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय हा वैयक्तीक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वेगाने हालचाली होत अजित पवारांची विधिमंडळ नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.


या राजकीय नाट्यादरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या 2 ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात पहिल्या ट्वीटमध्ये युवासेना प्रमुख आदित्या ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या सोबतचा फोटो आहे. तर, दुसऱ्या ट्वीटमध्ये युवा आमदार आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो आहे. यातून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध घनिष्ठ असल्याचे संकेत सुळे यांनी दिले आहेत. सोबतच हे संबंध पुढेही असेच राहितील असाही यातून सांगण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.


अजित पवारांची मनधरणी करण्यात पुन्हा अपयश -
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शांत असलेल्या अजित पवार यांनी मौन सोडले आहे. अजित पवार हे पहिल्यादांच ट्विटवर सक्रिय झाले आहेत. त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. तसेच राज्यात लोकांच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, असंही अजित पवार म्हणाले आहेत. मोदी यांच्याबरोबरच गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, भाजपाचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांचेही आभार मानले आहेत. यातून त्यांनी आपण निर्णयावर ठाम असून, त्यावरून माघार घेणार नसल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या दिले आहेत.

संबंधित बातम्या :

अजित पवार लोकांची दिशाभूल करत आहेत, आम्ही महाविकासआघाडीसोबतच - शरद पवार

शरद पवारच आमचे नेते, अजित पवारांचं ट्वीट, अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत माहीत नाही आव्हाडांची प्रतिक्रिया

Supriya Sule Emotional Reaction | माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी फसवणूक, अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेंची नाराजी