मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता अजित पवार पुन्हा 30 तासानंतर सोशल मीडियावर 'अ‍ॅक्टिव्ह' झाले असून त्यांनी अभिनंदनाचे ट्वीट स्वीकारले आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. अजित पवारांच्या बंडोखोरीमुळं पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी पक्षात परतावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एका बाजूला प्रयत्न करत असताना अजित पवारांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन असा ट्वीट करत राजकरणात एक नवा ट्विस्ट आणला आहे. तर अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहे हे मला माहित नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांच्या ट्वीटवर प्रतिक्रया दिली आहे.


'मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे आणि कायम राष्ट्रवादीमध्येच राहीन. शरद पवार हेच आमचे नेते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप मिळून राज्याला स्थिर सरकार देईल', असं अजित पवारांनी ट्वीट केलं आहे.


अजित पवारांच्या ट्वीटला प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला माहित नाही अजित पवार कोणत्या राष्ट्रवादीत आहे. ज्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर शरद पवारांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबरोबर राज्यातील आणि देशातील राष्ट्रवादी काँग्रेस आहे. भाजपाशी कोणतही नातगोत जोडायचं नाही या विचारांनी शरद पवार काम करतात. त्यामुळे अजित पवार कोणत्या राष्ट्रवादी पक्षात आहेत हे मला माहित नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या बैठकीत अजित पवार यांना गटनेतेपदावरून बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे ते गटनेते देखील नाही. ते जे ट्वीटवर लिहतात ते किती खरं आहे मला माहित नाही. शरद पवार यांनी जी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसची जी युती ठरवली आहे. त्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी काम करत आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही आणि भविष्यात देखील बदल होणार नाही, अस आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपच्या संपर्कात आलं की,  गोबेल्सचं भूत डोक्यावर बसत. एकदा गोबेल डोक्यात शिरला की, गोंधळ कसा करायचा यांच प्रशिक्षण देखील मिळत त्यातून हे ट्वीट त्यांनी केल आहे.

Ajit Pawar | मी राष्ट्रवादीतच आणि शरद पवारच आपले नेते - अजित पवार | ABP Majha