Nawab Malik : नवाब मलिक कोणाचे? फडणवीसांच्या पत्रानंतर सुनिल तटकरेंची सूचक प्रतिक्रिया
Sunil Tatkare On Nawab Malik : नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाचे असे प्रश्न आता लोकांना पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर अजित पवार गटाने सावध भूमिका घेतली आहे.
Sunil Tatkare On Nawab Malik : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना नवाब मलिकांच्या (Nawab Malik) मुद्यावरून विरोधाचे पत्र लिहिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फडणवीसांच्या पत्रावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. फडणवीस यांच्या पत्रानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मलिक यांच्याबाबत हात झटकले आहेत. तटकरे यांनी मलिक अजित पवार यांच्यासोबत आहेत की नाही यावर भाष्य करणे टाळलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक असल्याचे तटकरे यांनी म्हटले.
आमदार श्री. @nawabmalikncp हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी…
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 7, 2023
फडणवीसांचे अजित पवारांना पत्र
मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.
मलिक सत्ताधारी बाकांवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आज हजेरी लावली. यावेळी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली. सभागृह परिसरात नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची गळाभेट झाली. यानंतर सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे.