Sudhir Mungantiwar Controversial Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रचारसभेत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून (Controversial Statement) भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांच्या वक्तव्याची थेट निवडणूक आयोगाने (Election Commission) दखल घेतली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्विटरवर पोस्ट करत, निवडणूक आयोगाला टॅग करून सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांच्या याच पोस्टला उत्तर देत निवडणूक आयोगाने 'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे' असे उत्तर दिले आहे. 


सचिन सावंत यांनी केलेलं ट्वीट?


सचिन सावंत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणाची एक क्लिप ट्विटरवर पोस्ट करत लिहले आहे की,"निवडणूक आयोगाने तात्काळ सुधीर मुनगंटीवार यांच्या या भाषणाची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे म्हटले आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोग या विधानांवर निवडणूक आयोगाच्या मतानुसार कारवाई करतील ही अपेक्षा. मुनगंटीवार यांच्या या भाषेला आणि खोट्या आरोपांना त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. आम्हाला केवळ सत्य सांगावे लागेल,असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 






सचिन सावंत यांच्या तक्रारीवर निवडणूक आयोगाचं उत्तर....


सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाईची मागणी करत सचिन सावंत यांनी केलेल्या ट्विटला निवडणूक आयोगाकडून उत्तर देण्यात आला आहे. ज्यात निवडणूक आयोगाने म्हटले आहे की,'आपल्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. निवडणूक काळातील कोणत्याही गैरप्रकाराबद्दल आपण cVigil या ॲपवर तक्रार दाखल करू शकता.  प्रत्येक तक्रारीवर 100 मिनीटांमध्ये पहिली कार्यवाही' असे निवडणूक आयोगाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.




अर्धवट क्लिप व्हायरल :  सुधीर मुनगंटीवार


दरम्यान काँग्रेसकडून होणाऱ्या टीकेला सुधीर मुनगंटीवार यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. याबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की,"1984 साली काँग्रेसने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. 1984 च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोकपणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही,असे मुनगंटीवार म्हणाले.






इतर महत्वाच्या बातम्या :


Congress: 'सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा' , काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार