Success story : शेतीला जोडव्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय (Dairy Farming) करतात. या व्यवसायातून ते स्वत:ची आर्थिक प्रगतीही साधत आहेत. अशाच एका हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील शेतकऱ्यानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणली आहे. तीन एकर शेती आणि एका म्हशीपासून सुरु केलेला व्यवसाय आता विस्तारला आहे. आज त्या शेतकऱ्याकडे 100 एकर शेती आणि 100 म्हशी आहेत. रामेश्वर मांडगे असं हिंगोली जिल्ह्यातील बेलवाडी येथील शेतकऱ्याचे नाव आहे.


म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दोन प्रकारचे गोठे 


शेतकरी रामेश्वर मांडगे यांच्याकडे मुरा आणि जाफराबादी प्रजातीच्या 100 म्हशी आहेत. म्हशी जास्त म्हणल्यावर त्यांना चाराही जास्त लागणार. दरवर्षी शेतकरी रामेश्वर मांडगे स्वतः कडे असलेल्या 60 ते 70 एकर शेत जमिनीवर वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याची लागवड करतात. या म्हशींना दररोज लागवड केलेल्या चाऱ्यापैकी दोन ट्रॉल्या चारा दिला जातो. त्याचबरोबर या चाऱ्यासोबत हरभरा, ज्वारी, करडई, मका हे धान्य भरडून दररोज सरकी पेंडीचा खुराक एकत्र करुन म्हशींना दिला जातो. या म्हशींच्या शेतकरी मांडगे यांनी दोन प्रकारचे गोठे बांधले आहेत. एक बंदिस्त प्रकारचा गोठा आणि दुसरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अध्यायावत केलेला एक गोठा आहे. या दोन्ही गोठ्यात या म्हशींचं व्यवस्थापन केलं जातं.


म्हशींसाठी खास स्विमिंग पूल


100 म्हशींच्या व्यवस्थापनासाठी दररोज याठिकाणी पाच ते सहा कामगार राबतात. या म्हशींच्या व्यवस्थापनासाठी हे कामगार दररोज सकाळी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत राबतात. सकाळी दूध काढल्यानंतर या म्हशींना बंदिस्त गोठ्यामध्ये नेलं जातं. दुपारच्या वेळी उन्हाच्या फटक्यापासून म्हशींचा बचाव व्हावा यासाठी शेतकरी मांडगे यांनी खास स्विमिंग पूल बांधला आहे. 


दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते


दूध व्यवसायातून मांडगे यांनी आर्थिक समृद्धी मिळवली आहे. आज त्यांच्याकडे 100 एकर शेती आणि 100 म्हशी आहेत. परंतु काही वर्षांपूर्वी मांडगे यांच्या कपाळी गरिबीचा शिक्का लागलेला होता. हा शिक्का कसा पुसायचा याच विचारातून त्यांचे वडील आणि रामेश्वर मांडगे यांनी एक म्हैस आणि तीन एकर शेतीमधून या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 100 म्हशी आहेत. या म्हशीपासून दररोज 350 ते 400 लिटर दूध निघते. हे दूध कामगार आणि मांडगे स्वतः घरोघरी विकतात. त्याचबरोबर म्हशीच्या शेणाचा खत म्हणून वापर केल्याने मांडगे यांच्याकडे असलेल्या शंभर एकर शेतीमध्ये लागणारा खताचा खर्च कमी झाला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Milk Production : भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश, जागतिक उत्पादनात 24 टक्के वाटा