Jalgaon News Update : असं म्हटलं जातं की, थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी. परंतु, जळगावध्ये ही गोष्ट प्रत्यक्षात उतरली आहे. दृष्टीहिन पित्याच्या काळजीपोटी मुलींनी पुढाकार घेत त्यांचा 59 वर्षीय आजीसोंबत लावून दिला आहे.  जळगावमधील धरणगाव येथील अॅड. हरिहर पाटील आणि मीना चौधरी हे सात फेरे घेत एकमेकांचे बनले आहेत. या विवाहासाठी दोघा मुलींसह जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त गणेश चाटे, शहर अभियान व्यवस्थापक गायत्री पाटील-महाले यांनी पुढाकार घेतला.


हरिहर पाटील यांच्या पत्नीचे डिसेंबरमध्ये निधन झाले. हरिहर पाटील हे स्वतः दृष्टी दोषामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे मुलींच्या विवाहानंतर पुढील आयुष्यासाठी हरिअर पाटील यांना आधाराची गरज होती. यातूनच बेघर किंवा अनाथ महिलेशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. हरिहर पाटील यांनी जळगाव महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रातील मीना चौधरी या आजीशी भेट घेतली. त्यानंतर दोघांचीही मनं जुळून आली. त्यामुळे त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेत विवाहबद्ध झाले. 


हरिहर पाटील हे अंध असल्याने त्यांना नेहमी आधाराची आवश्यकता असते. त्यांची पत्नीच त्यांचा आतापर्यंत आधार होती. परंतु, डिसेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना दोन मुली आहेत. एकीचा विवाह झालेला आहे तर दुसरीचा या आठवड्यात विवाह होणार आहे. पत्नीचे निधन झाले, मुलींची लग्ने झाली मग आता हरिहर यांचा आधार कोण होणार याचा प्रश्न सर्वांसमोर होता. त्याचवेळी दोन्ही मुलींच्या डोक्यात त्यांचा दुसरा विवाह करून देण्याचा विचार आला. त्यावेळी हरिहर यांनी बेघर किंवा अनाथ महिलेसोबत विवाह करणार असे सांगितले. त्यानुसार मुलींनी वधूची शोधाशोध सुरू केली, हरिहर पाटील यांनी आपला जीवनसाथी निवडण्यासाठी मनपाच्या बेघर निवारा केंद्रात विचारणा केली. त्यांची अडचण लक्षात घेत मनपा अधिकारी गायत्री पाटील यांनी त्यांना बेघर निवारा केंद्रात गेल्या चार वर्षांपासून राहत असलेल्या 59 वर्षीय मीना चौधरी यांची ओळख करून दिली. दोघांचे विचार जुळले, त्यानंतर सर्व सोपस्कर पार पडले आणि आज त्यांचा मोठ्या उत्साहात विवाह पार पडला. 


मीना चौधरी यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईची काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून आयुष्यभर अविवाहित राहणे पसंत केले होते. मात्र, आईच्या निधनानंतर आणि लग्नाचे वय निघून गेल्यावर मात्र त्याही एकाकी जीवन जगू लागल्या.  त्यांचा सांभाळ करणारे कोणी नसल्याने त्यांनी बेघर निवारा केंद्रात आपला निवारा शोधला. शिवाय आपल्या दिवंगत पत्नीने मृत्यूपूर्वी आपल्याला आणि आपल्या मुलींना आपला पुन्हा विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आपली काळजी घेता यावी म्हणून आपण हा विवाह करण्याचा निर्णय घेतला. आमच्या विवाहाला दोन्ही मुलींचा आणि आपल्या मित्र परिवाराचा पाठिंबा आहे. आपला विवाह एक चांगला सामाजिक बदल घडविणारा असल्याचं हरिहर पाटील यांनी म्हटलं आहे.  


बेघर निवारा केंद्रात लग्नाची धूम


जळगाव महानगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आज सकाळपासूनच या विवाहाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण होतं. निवारा केंद्रातील सर्वच सदस्य आपल्या परिवारातील मीना यांच्या विवाहाच्या तयारीसाठी धावपळ करत होते. मंडप सजवणे, हार-तुरे आणणे, आलेल्या पै-पाहुण्यांची विचारपूस करणे यातच गुंतले होते. 


समुपदेशनाने मिळवला मीना चौधरींचा होकार


"आपल्या लग्नानंतर आईची काळजी कोण घेईल? तसेच आईची सेवा करण्याच्या विचाराने मीना चौधरी यांनी विवाह केला नव्हता. त्यांच्या आईचेही काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. दरम्यान, त्या जॉबही करत होत्या. हरिहर पाटील यांनी देखील बेघर निवाऱ्यातील एखाद्या बेघर महिलेशी विवाहास संमती दर्शवल्यानंतर आपण आधार देऊ शकतो. त्यानंतर संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रातील काही महिलांशी बोलल्यानंतर तसेच मीना चौधरी यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी या विवाहाला होकार दिला, अशी माहिती बेघर निवारा केंद्र प्रमुख गायत्री पाटील यांनी दिली.