4th March Headlines :  महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याबरोबरच बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण


 महानगरपालिका आणि ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.  ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. तसेच, केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. 
 
बेस्ट बेकरी केस प्रकरणी निकाल


बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय  निकाल देणार आहे. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या प्रकरणी जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. याप्रकरणातील दोन फरार आरोपींविरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर आज कोर्ट आपला राखून ठेवलेला निकाल जाहीर करणार आहे.. 


खासदार इम्तियाज जलिल यांचे उपोषण
 
औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याच्या विरोधात आज खासदार इम्तियाज जलिल उपोषण करणार आहेत. जलिल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजल्यापासून साखळी उपोषण करणार आहेत. तर छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्याच्या समर्थनार्थ दुपारी 12 वाजता मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आलीय. टिव्ही सेंटरजवळ मनसेच्या वतीनं ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. 


 अहमनदनगरमध्ये राष्ट्रवादीचा जनआक्रोश मोर्चा


अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सकाळी 10 वाजता नगर - पुणे रोडवर शेतकरी जन आक्रोश आंदोलन रास्ता रोको होणार आहे. कांद्याचे दर कमी झाल्याने हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तर संगमनेरमध्येही बसस्थानकासमोर सकाळी 9 वाजता नाशिक – पुणे महामार्गावर आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 
  
 अहमदनगरमध्ये सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन


अहमदनगर येथे सावता परिषदेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन आज होणार आहे... या अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे... सकाळी ११ वाजता नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे दोन सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे... माळी समाज बांधवांच्या विविध प्रश्नांबाबत या अधिवेशनात चर्चा होणार आहे. 


संजय राऊतांची पुण्यात पत्रकार परिषद 


 शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद आहे. कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रवींद्र धंगेकर हे संजय राऊत यांना भेटणार आहेत. 


 कोल्हापुरात मोर्चा 


एकच मिशन जुनी पेन्शन या टॅगलाईन खाली आज कोल्हापुरात महामोर्चा निघणार आहे.. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा असून कुटुंबीयांसह या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 


 महिला IPL


आजपासून महिला IPL च्या मॅचला होणार सुरूवात होणार आहे. 2023 चा पहिला महिला आयपीएल सीजन आजपासून खेळवला जात आहे. मुंबईतील दोन स्टेडियमवर या मॅच खेळवल्या जाणार आहेत.