माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंडनजीकच्या नदीपात्रात अडकलेल्या 50 ते 55 पर्यटकांची काल (रविवारी) सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
पावसाने रायगड जिल्ह्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली. या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबई आणि ठाणे येथील 50 ते 55 तरुण तरुणींचा एक ग्रुप कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेल्या देवकुंडनजीकच्या नदीपात्राजवळ गेला होता.
मात्र, यावेळी नदीकडच्या दुसऱ्या भागात हे सर्व पर्यटक अडकले होते. यासंदर्भातील माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. नदीच्या प्रवाहाचा वेग बघता कोलाड येथील रिव्हर राफ्टर्सना मदतीसाठी पाचारण करण्यात आलं. अखेर रोपच्या सहाय्याने या सर्वांना सुखरूप नदीपात्राबाहेर काढण्यात आले आहे.