सोलापूर : नातं रक्ताचं असलं तरी अश्रू ढाळायला बंदी होती. 22 वर्षांच्या सहवासात गोपीनाथ मुंडे जेवढे मला समजले, तेवढे कुणालाही समजले नाही, असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे भावूक झाले.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत आयोजित वंजारी समाज मेळाव्यात धनंजय मुंडेंनी दिवंगत नेते आणि चुलते गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलायला लागलो तर रात्रंदिवस बोलेन. गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वावर बोलणारे राज्यात अनेक जण असतील, पण व्यक्तीवर बोलणारा मी एकटा आहे, असंही धनंजय मुंडे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांच्याशी झालेल्या वादानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत दोघांचेही संबंध टोकाला पोहोचले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वातही बहिण-भावाचे हे संबंध टोकाचेच राहिले.