चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर सध्या स्टंट बायकिंगचा उच्छाद बघायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या स्टंट बायकर्सचा सामान्य लोकांना कसा त्रास होतोय याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काल (26 जानेवारी) चंद्रपूर शहरातील CDCC बँकेसमोर अशाच एका बाईक स्टंट करणाऱ्या युवकाने एका दुचाकी चालकाला जोरदार धडक दिली व त्यात हा दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे.


काल 26 जानेवारी असल्यामुळे अनेकांच्या अंगात देशभक्तीचा ऊत आला होता. गणतंत्र दिवस म्हणजे नक्की काय हे सुद्धा माहित नसलेले अनेक टोळके शहरात भरधाव गाड्यांवर फिरत होते आणि त्यामुळे काल या स्टंट बायकर्सचा धुमाकूळ पाहण्यासारखा होता. त्यातच शहरातील नागपूर-चंद्रपूर मार्गावर असलेल्या CDCC बँकेसमोर एका बाईकरचा स्टंट करताना तोल गेला आणि रस्त्याने जाणाऱ्या 34 वर्षीय हरदीप साहनी या तरुणाला त्याची धडक बसली. या धडकेमुळे हरदीपच्या डोक्याला जबर मार बसला असून त्याला चंद्रपूर शहरातल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अपघात झाल्यावर आदर्श नन्हेट या आरोपी बाईकरने तिथे थांबून जखमी व्यक्तीची मदत करण्याचे देखील सौजन्य दाखवले नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला.


स्टंट बाईकर्समुळे सामान्य लोकांचे रस्त्यावरून चालणे दुरापास्त
धक्कादायक म्हणजे आरोपी बाईकर आदर्श नन्हेट हा सर्व स्टंट चित्रित करवून घेत होता आणि हे स्टंट रेकॉर्ड करणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यांनीच ही घटना चक्क सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळेच या सर्व प्रकरणाला वाचा फुटली आणि जखमी अवस्थेतील वाहनचालकाला सोडून स्टंट बाइकरने पळ काढतानाची दृश्ये देखील यात रेकॉर्ड झाली. चंद्रपूर जिल्ह्यात हे बाईकर्स धुमाकूळ घालत असताना चंद्रपूर पोलिसांची बोटचेपी भूमिका पुन्हा समोर आली आहे. सामान्य लोकांना वाहतुकीचे नियम सांगून त्यांचे खिशे रिकामे करणाऱ्या चंद्रपूर पोलिसांना हे स्टंट बाईकर्स कधीच दिसत नाही हे विशेष. अवैध धंद्यांचा चंद्रपूर जिल्ह्यात महापूर आलेला असताना आता या स्टंट बाईकर्समुळे सामान्य लोकांचे रस्त्यावरून चालणे देखील दुरापास्त झाले आहे. चंद्रपूर शहरात स्टंट बाइकिंगचा इतका जीवघेणा प्रकार समोर आल्यावर देखील पोलिसांचे तपास सुरु आहे, आरोपी फरार आहे हे छापील उत्तर कायम आहे.