नाशिक : यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडत आहे. नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास बघता हे संमेलन नाशिकमध्ये व्हावं अशी मागणी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य महामंडळाला करण्यात आली होती. त्यानुसार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये पाहणी करत ही मागणी पूर्ण केली असून 26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे. हे संमेलन आगळ वेगळ कसे होईल यासाठी लोकहितवादी मंडळ प्रयत्नशील आहे. यासोबतच नाशिकमध्ये साहित्यिकांचा मेळावा भरवत या माध्यमातून शरद पवारांनाही सहस्त्रचंद्रदर्शनाची खास भेट देण्याचा लोकहितवादी मंडळाचा मानस असल्याची चर्चा आहे.


साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील म्हणाले, सहस्त्रचंद्रदर्शन वगैरे चर्चा आहे मात्र तसा प्रस्ताव आल्यास आम्ही परवानगी देणार नाही. तसेच ज्यांचा काही रोल नाही अशा राजकीय लोकांना व्यासपीठावर घेतले जाणार नाही. उद्घाटक पण राजकीय व्यक्ती नसतील लेखक किंवा लेखिकाच असतील.


एकीकडे संमेलनाचे सर्व नियोजन सुरु असतांनाच दुसरीकडे कौतिक ठाले पाटलांच्या या वक्तव्यामुळे संमेलनाचे आयोजक लोकहितवादी मंडळाची मोठी अडचण झाली आणि त्यांनी अडचणीत सापडणं हे पण साहजिकच आहे. कारण या मंडळाचे विश्वस्त आणि नाशकात होणाऱ्या संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तर आहेत. यासोबतच ते शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच आता सरकारही महाविकास आघाडीचे असल्याने टकले यांनी पत्रकार परिषद बोलवत राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर बोलवावेच लागेल असं स्पष्ट केल.


कुठल्याही राजकीय व्यक्तीला आम्ही बोलावणार नाही असं साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील जरी म्हणत असले तरी संमेलनाला शासनाकडून अनुदान मिळते. इतर मदत मिळते त्यामुळे आम्हाला मंत्री नेते यांना बोलवावचं लागेल, साहित्य महामंडळाने आखून दिलेली सगळी चौकट आम्ही पाळू, असे लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले म्हणाले.


एकंदरीतच काय तर नेहमीप्रमाणे यंदाही साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर वादाला ठिणगी पडली आहे आणि याला कारण मात्र एकच आहे ते म्हणजे राजकारण. यंदाच्या 94 व्या मराठी साहित्य संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांना संमेलनाचे मानाचे स्थान दिले गेले आहे. स्वागताध्यक्ष पदी राष्ट्रवादी नेते तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, स्वागत समितीच्या उपाध्यक्ष पदी शिवसेना नेते तथा कृषीमंत्री दादा भुसे आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली गेली. तसेच संमेलनासाठी स्थापन होणाऱ्या विविध 39 समित्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या विश्वास ठाकुर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.


मुळात साहित्य संमेलनात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपावर आजवर अनेक साहित्यिकांनी सडकून टीका केली आहे. मात्र त्याचा कुठलाही परिणाम होत नसून यंदा महाविकास आघाडीच्या काळात होणाऱ्या संमेलनातही हिच बाब स्पष्टपणे दिसून येईल यात काही शंका नाही. आता फक्त साहित्यिकांपेक्षा राजकारण्यांचीच उपस्थिती संमेलनात जास्त दिसू नये ही अपेक्षा काही जणांनी व्यक्त केली आहे.


संबंधित बातम्या :




अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड



Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | संमेलन प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव?