यवतमाळ : मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमी प्रेताचा सांभाळ करून सरण रचून देणारा आणि मृत व्यक्तीची राखड उचलून देऊन स्मशानभूमीतुन बाहेर जाणाऱ्या व्यक्तीसमोर शंख आणि टनमन वाजवून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांकडे दान मागणारे 'मसणजोगी' आज उपेक्षितांचे आणि लॉकडाऊनपासून हलाखीचे जीवन जगत आहे. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात त्याच स्मशानभूमीत कुटुंबासह राहणार आणि स्मशानभूमीची राखण करणारा मसणजोगीला कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात कुणी भिक्षा सुध्दा देत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.



हातात माणसाची कवटी दुसऱ्या हातात घंटा, गळ्याला रंगबिरंगी माळा आणि कंकाल, शंख तसेच (टनमन) घंटा आणि शंकर आणि इतर देव देवतांचे छापे असलेले अलंकार त्यात त्याचा विचित्र प्रकारचा लाल भडक झबला आणि काखेत झोळी आणि डोक्यावर फेटा बांधून मसणजोगी दारोदारी भिक्षा मागत फिरायचा. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील गावाच्या वेशीवर असलेल्या (मसनवाट्यात) स्मशानभूमीत अनेक वर्षांपासून कचरू उप्पेवाड राहतात. कचरू यांचे संपूर्ण आयुष्य स्मशानभूमीत गेले. तेथे आलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करते वेळी सरण रचणे मृत्यू झालेल्या व्यक्तीची राखड उचलून नातलगांना देणे आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसमोर शंखनाद आणि घंटानाद करून टनमन वाजवत स्मशानभूमीच्या दारासमोर कापड टाकून सोडवणं मागने आणि गावोगावी जाऊन कुटूंबासह (जोगवा) भिक्षा मागणे हेच काम त्यांनी आयुष्यभर केले.



आता त्यांचा मुलगा संजय हे परंपरागत काम करतोय. संजय याला चार मुले, पत्नी, आई आणि (लखवा) अर्धांगवायू झटका येवून आजारी पडलेले वडील कचरू उप्पेवाड त्यांचीही त्याच्यावर जबाबदारी आहे. ते महागावच्या स्मशानभूमीत असलेल्या झोपडीत राहतात. पूर्वी गावागावात भिक्षा मागताना लोक धान्य काही पैसे आणि काहीतरी भाकर द्यायचे आता तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन पासून बोटांवर मोजावे असे मोजकेच लोक अंत्यसंस्कारसाठी स्मशानभूमीत येतात. आणि कोरोनाचा संसर्ग वाढतो म्हणून गावात कुणी भिक्षा सुध्दा मागू देत नाहीत. त्यामुळे अडचणी वाढल्याचे कचरू उप्पेवाड यांनी सांगितले.



अंत्यविधीसाठी आलेले लोक पूर्वी कपड्यावर दोन पाच रुपये टाकायचे आता मात्र सोडवन देणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. भिक्षेसाठीची भटकंती सुद्धा थांबली आहे. स्मशानभूमीत वास्तव्य करीत मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भगवान शंकराकडे प्रार्थना करणारा मसणजोगी आजपर्यंत भटकंती करीत राहिल्याने निरक्षर राहिला आहे. मसणजोगी विशिष्ट पोशाख (साज) घालून करूनच अंत्यसंस्कार वेळी उपस्थित असतो आणि त्याच वेषात तो गावोगावी भटकंती करीत भिक्षा मागतो.



सामाजिकरित्या हा समाज अजूनही उपेक्षितच राहिला आहे. पूर्वी गावांत कुणाच्या मृत्यूची वार्ता कळताच मसणजोगी अंत्यसंस्काराच्या कामाला लागायचा आणि स्मशानभूमीच्या समोर घंटानाद करीत बसायचा आता कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे सार सार थांबले आहे. गावाबाहेरचे असे भिक्षेकरी उपेक्षित 'मरणाच्या वाटेवरच जगणं' लॉकडाऊनमुळे आणखी हलाखीच्या गर्तेत घेऊन जाणारे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, ढानकी, मांडवी, दिग्रस, दारव्हा इत्यादी भागात हे बांधव राहतात. तसेच औरंगाबाद, भोकरदन आणि भागात भाऊबंदकी राहत असल्याचे संजय उप्पेवाड यांनी सांगितले आहे.



'पूर्वी लहान वयातच आमच्या मुला मुलींचे लग्न व्हायचे लहान असताना वडिलांसोबत गावोगावी बिऱ्हाड घेऊन जात असल्यानं एका गावात 8 दिवस, तर कुठे 10 दिवस करत पाल बांधून राहत गेलो. त्यामुळे शिक्षण झाले नाही, आता मात्र म्हाई जी गत झाली, ती लेकरांची होऊ नये म्हणून त्यांना कष्ट करून शिक्षण देऊन मोठं करायच स्वप्न आहे.' असे संजय उप्पेवाड सांगतात. संजय यांना चार मुले सतीश, श्रीकांत, राम आणि लखन ते चारही शाळेत जातात. लॉकडाऊनमुळे आई, वडील आणि पत्नी आम्ही सारे घरीच एवढा मोठा परिवार असून आता अडचणी खूप आहेत. घरात बरेचदा साखर चहापत्ती सारख्या गोष्टीही घरात राहत नाही. त्यावेळी नाईलाजाने लोकांना मागतो.



माझं मसणजोगीचे परंपरागत काम मात्र मुलांनी मोठं होऊन हे काम करू नये असे वाटते असे संजय उप्पेवाड यांनी म्हटले. गावात (साज) पोशाख घालून आई बापू एक पायली दे म्हणतं भिक्षा मागतो त्यावेळी ज्यांनी दान दिले त्यांच्या आई वडिलांचा उद्धार करायचा अन शंख वाजवून टनमन वाजवून पुढे पुढे जातो असं काम. कुणी दान दिल तर ठीक नाही दुसरं घरासमोर असंच दान मागतो. असंही ते बोलताना म्हणाले.



मी जर कधी भिक्षा मागण्यासाठी भटकंती करत बाहेरगावी गेलो तर माझी मुलं आदल्या दिवशी ज्या व्यक्तीला स्मशानभूमीत जाळले त्या मृत व्यक्तीची राखड उचलून नातलगांना देतात. आमचे अनेक भाऊ वेगवेगळ्या गावात राहतात. त्याची नाव गंधेवाड, पल्लेवाड, ईरावाड, सल्लेवाड, तुप्पेवाड अशी आहेत. आम्ही शंकराचे भक्त आहोत, त्याचीच सेवा करतो आणि घरीदारी तेलगू बोलतो. आमच्या अनेक नातलग आंध्रप्रदेशमध्ये राहतात. माझ्या पत्नीला मराठी बोलता येत नाही. मात्र मुलं मात्र मराठी बोलतात.



आम्हाला कुणाचा आधार नाही घरकुल नाही शासनाने आमच्याकडे जरा लक्ष देली तर आम्ही आमची लेकरं या (मसनट्यातून) स्मशानभूमीतून बाहेर पडू, असं संजय उप्पेवाड यांनी सांगितले आहे. गावात कुणी मरण पावले की स्मशानभूमीत चूल पेटते, हे मसणजोगी यांचे उपेक्षित जगणं सुटेल का?