Beed News Update : बीड मधील (Beed) एका गोरक्षकाचा केंद्र सरकारने पद्मश्री (Padmashri) पुरस्कार देऊन गौरव केला आहे. शंभरपेक्षा जास्त गाईंचा सांभाळ करणाऱ्या शब्बीर मामुंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला आहे.  मात्र या गोरक्षकाची सध्या फरपट सुरू झाली आहे. त्यांच्याकीडल गायींना ना चारा, ना पाणी अशी स्थिती निर्माण झाली आहे. 


बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी गावचे सय्यद शब्बीर मामू हे शंभरपेक्षा जास्त गायींचा सांभाळ करतात. त्यांच्या याच कार्याची दखल देऊन 2019 ला त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. परंतु, ज्या गोरक्षणामुळे शब्बीर मामुची ओळख देशाला झाली त्याच शब्बीर मामुला आता आपल्याकडे असलेल्या दीडशे गायींचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न पडलाय. 


फक्त शब्बीर मामूच नाहीतर त्यांची तिसरी पिढी या गोरक्षणाच्या कामांमध्ये त्यांना मदत करत आहे. मात्र हे गोरक्षण करताना या गायींना पिण्यासाठी पाणी नाही, राहण्यासाठी निवारा नाही. शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाण्यासाठी हिरवा चारा देखील  मिळत नाही. त्यामुळे या गायींना पाणी पाजण्यासाठी बीड जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातील कासारवाडी गावातील तलावावर घेऊन जावं लागत आहे. यासाठी रोज पाच किलोमीटरचा डोंगर पार करून तलावावर पोहोचावलं लागतं. 


उन्हाळ्यामध्ये कायमस्वरूपी या गायींना पिण्यासाठी पाणी आणि त्या पाण्यातून हिरव्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी म्हणून शब्बीर मामुंनी आपल्या शेतामध्ये एक विहीर खोदली. मात्र स्वतः कडचे पैसे संपले आणि या विहिरीचं काम मध्येच बंद करावं लागलं. त्यामुळे विहिरीचे काम पूर्ण करून या गायींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी खुद्द पद्मश्रीलाच करावी लागतेय. 
 
या गायींना चारा आणि पाण्यासह निवाऱ्याची व्यवस्था व्हावी यासाठी शब्बीर मामुंनी अनेकदा जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवले आहेत. पद्मश्री मिळाल्याने ज्या बीड जिल्ह्याची मान उंचावली होती त्याच जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला आता शब्बीर मामुंचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.   


कसाई ते गोरक्षक


शब्बीर मामू यांचे वडील बुढण सय्यद हे कसाई होते. शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात भाकड गाई, बैल खरेदी करून कत्तलखान्यात विकत असत. एकदिवस अचानक आपण जे काम करतोय हे पाप आहे, असे लक्षात आल्यानंतर बुढण सय्यद यांनी हे काम सोडण्याचा निर्णय घेतला व या निष्पाप जीवांची सेवा करण्याचे व्रत घेतले. त्यानंतर त्यांनी 1970 च्या दशकात दोन गायींपासून गोशाळेची सुरुवात केली. आपल्या वडिलांच्या या पवित्र कामात शब्बीर मामूदेखील तरुणवयापासूनच सामील झाले. शब्बीर मामूने जेव्हा ही सुरुवात केली त्यावेळी त्यांना गोहत्या, गोशाळा, गोरक्षण अशा कोणत्याही गोष्टींची माहिती नव्हती. मात्र, एकच कळत होते ते म्हणजे मुक्या जीवावर शब्बीर मामूंचे असलेले प्रेम आणि आपण काहीतरी चांगलं करतोय याची जाणीव. मागील 50 वर्षांत सय्यद शब्बीर मामूंच्या कुटुंबीयांनी शेकडो देशी गायी व जनावरांचा सांभाळ केला आहे. शेकडो गायींना कत्तलखान्यात नेण्यापासून वाचवले आहे. आजोबा, वडील आणि आता शब्बीर मामू आणि त्यांची मुले अशा एकाच कुटुंबाच्या चार पिढ्या गोरक्षणासाठी काम करत आहेत.