Lal Vadal : अखिल भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे. काही मागण्या विचारधीन आहेत. जोपर्यंत अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत मोर्चा तूर्तास त्याच ठिकाणी मुक्कामी राहणार असल्याचे कॉम्रेड जीवा पांडू गावित यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर शेतकऱ्यांनी लाँग मार्च आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. 

 

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, माजी आमदार कॉम्रेड जे. पी. गावित, किसान सभेचे राज्य सरचिटणीस अजित नवले, माकपचे आमदार विनोद निकोले, किसान सभेचे नेते आणि माकपचे राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, 'सीटू'चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल कराड हे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते



शेतकऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एबीपी माझाला दिली. शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मोर्चाबाबत आणि त्यांच्या मागण्यांबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत निवेदन करणार आहेत, असेही सत्तार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याच्या माहितीला आमदार विनोद निकोले यांनी दुजोरा दिला. 


तोपर्यंत माघार नाही


शेतकऱ्यांचा मोर्चा तू्र्तास वाशिंद येथेच थांबणार आहे. जोपर्यंत मागण्यांवर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत मोर्चातून माघारी जाणार नाही. मागील मोर्चाचा अनुभव आहे, आश्वासन दिले जाते. मात्र अंमलबजावणी केली जात नाही.  यावेळी आश्वासनाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार नाही. अधिवेशन होईपर्यंत आम्ही सरकारला मुदत दिली आहे, असे किसान सभेचे गावित म्हणाले.


किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. शिष्टमंडळामध्ये 14 जणांचा समावेश करण्यात आला होता. आपल्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांनी नाशिकपासून लाँग मार्च काढत मुंबईकडे आले होते. सध्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा ठाण्यात आलेला आहे. मागण्या मान्य झाल्यामुळे उद्या मोर्चा माघारी घेण्यात येणार असल्याचे समजतेय.  


लाँगमार्च आंदोलन थांबविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन


राज्यातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून आज शेतकरी लाँग मार्चच्या शिष्टमंडळाबरोबर सर्व मुद्दांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. यासंदर्भात विधीमंडळाच्या सभागृहात निवदनाद्वारे माहिती देण्यात येईल. लाँगमार्च आंदोलन थांबविण्यात यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज विधानभवनात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, शेतकरी शिष्टमंडळातील डॉ. अशोक ढवळे, विनोद निकोले, इंद्रजीत गावित, अजित नवले, उमेश देशमुख, डी. एल. कराड यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. 


सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत परंपरागत पद्धतीने आदिवासी कसत असलेल्या जमिनी, वनहक्क दावे, कांद्याचा प्रश्न, वनांमधील अतिक्रमणे, गायरान जमिनी, शेतकऱ्यांना बारा तास वीज, शेती विषयक कर्ज आदी विविध मुद्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी माजी आमदार जीवा गावीत यांनी विविध मागण्या मांडल्या. त्यावर राज्य शासनाने दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल गावीत यांनी आभार व्यक्त केले. 


 


किसान सभेचं शिष्टमंडळ
1) जे पी गावित (माजी आमदार)
2) इरफान शेख
3)  गावित
4) डॉ डी एल कराड 
5) अजित नवले
6) उदय नारकर
7) उमेश देशमुख
8) मोहन जाधव
9) अर्जुन आडे 
10) किरण गहला
11) रमेश चौधरी 
12) मंजुळा बंगाळ