जालना/औरंगाबाद : जालन्यातलं बदनापूर पोलिस स्टेशन सध्या चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे इथल्या पोलिस निरीक्षकांची एकतर तात्काळ बदली होते किंवा पोलिस निरीक्षकच स्वत:ची बदली करुन घेतात. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप आणि दबाव होत असल्याचा आरोप होत आहे.


 
जालन्यातल्या बदनापूर पोलिस स्टेशनच्या बोर्डवरील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळावर नजर टाकली, तर पोलिस स्टेशन कोण चालवतंय असा प्रश्न पडेल. गेल्या 2 वर्षांत तब्बल 10 अधिकारी बदलले.

 
नुकतंच पोलिस निरीक्षक विद्यानंद काळेंनी भाजप आमदार नारायण कुचे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणार असल्याचा मेसेज थेट पोलीस अधीक्षकांना पाठवला आणि गृहखात्याची अक्षरश: लक्तरं निघाली.

 
खरं तर अधिकाऱ्यांच्या बदलीचेही काही नियम आहेत. पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी एका पोलिस ठाण्यात 3 वर्ष काम करणं गरजेचं आहे. जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी 6 वर्ष आणि एका विभागातून दुसऱ्या विभागात बदलीसाठी 9 वर्षांचा कालखंड पूर्ण व्हावा लागतो.

 
काही अपवादात्मक स्थितीत वरिष्ठांना कार्यकाळापूर्वी बदली करण्याचा अधिकार आहे. मात्र बदनापूर पोलीस स्टेशनच्याबाबतीत हा नियमच अपवाद झाल्याचं दिसून येते.

 

विशेष म्हणजे काळे रुजू होण्याआधी हे पोलीस 7 महिने पोलीस निरीक्षकाविना चाललं. आता पुन्हा भाजप आमदार नारायण कुचेवर, धमकी देऊन बेकायदेशीर कामं करायला लावत असल्याचा आरोप होत आहे.

 
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या आमदारांना आवरण्याची गरज आहे. नाही तर यापुढे बदनापूर पोलिस स्टेशनमध्ये कोणताही अधिकारी रुजू होण्याची हिंमत करणार नाही, असं म्हटलं जात आहे.