Pune Crime News: पुण्यात काही दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय (Pune Crime) तरुणाने सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) जाळ्यात अडकून आत्महत्या केली होती. त्याच्या आरोपीला पकडायला गेलेल्या पुणे पोलिसांवर राजस्थानमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी सेक्सटॉर्शनमार्फत खंडणी उकळणाऱ्या मास्टरमाईंड आरोपीला पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. अन्वर सुबान खान असं त्या आरोपीचं नाव असून तो राजस्थानातील लक्ष्मणगढ तालुक्यातील रहिवाशी आहे.
पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे एका मुलाने आत्महत्या केली होती. हा मुलगा इन्स्टाग्राम आयडीवरुन एका अनोळखी प्रीत यादव नावाच्या आयडीवर चॅटिंग करत होता. त्यावेळी प्रीत यादव नावाच्या आयडीवरुन त्याचे अर्ध नग्न फोटो पाठवण्यास सांगितले होते. मुलाने देखील ते पाठवले होते. काही दिवसानंतर या प्रीत यादवने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 4 हजार 500 रुपये फोन पे वरुन घेतले होते. त्यानंतर वारंवार पैशाची मागणी करत होती. त्याच्या भावाला देखील त्याचे काही फोटो पाठवले होते. शिवाय यासंदर्भात संबंधित तरुणाने त्याच्या मैत्रिणीलाही माहिती दिली होती. वारंवार धमकी आल्याने अखेर शंतनूने टोकाचं पाऊल उचललं. 28 सप्टेंबर रोजी घराच्या इमारतीवरुन खाली उडी मारुन 19 वर्षीय मुलानेे आत्महत्या केली.
बदनामीच्या भीतीने आत्महत्या
प्रीत यादव नावाच्या अकाउंटवरुन तरुणाच्या भावाला देखील तरुणाचा अर्धनग्न फोटो पाठवला होता. त्यानंतर लगेच त्याने तो फोटो डिलीट केला होता. हा फोटो एका व्हिडीओचा स्क्रीनशॉट होता. हा फोटो पाहून भाऊ हादरला होता. याबाबत तरुणाच्या मैत्रिणीला कल्पना होती आणि तो मानसिक तणावात असल्याचंही माहित होतं. पैशाची मागणी करत असल्याचं तरुणाने मैत्रिणीला सांगितलं होतं. मात्र त्यावर उपाय करण्याआधीच बदनामीच्या भीतीने 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.
पोलिसांचा फिल्मीस्टाईल पाठलाग
या प्रकरणातील आरोपी राजस्थानमध्ये असल्याची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस राजस्थानातील लक्ष्मणगढ तालुक्यात पोहचले. यावेळी त्याच्या गावातील पोलिसांनी आणि त्याच्या घरच्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपीचा अडीच किलोमीटर पाठलाग केला आणि आरोपीला पकडलं. राजस्थानमध्ये अनेक तरुण सेक्सटॉर्शनमार्फत पैशाची मागणी करतात. याचं त्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण देखील घेतलं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
तरुण मुलं रडारवर
सेक्सटॉर्शन हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. हा गुन्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घडतो. जिथे गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात. व्हिडीओ कॉल करत नग्न व्हायला सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. हे फोटो पाठवून पैशाची मागणी केली जाते. यात तरुण मुलं टार्गेट होत असल्याचं अनेक प्रकरणांमधून समोर आलं आहे.