औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यभरात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. परंतु औरंगाबादमध्ये या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.


हर्सूलमधे चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

यामध्ये तीन आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सिंधुदुर्गातही आंदोनाला हिंसक वळण

सिंधुदुर्गात आयोजित चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही भागात रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. तर मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं तोडून वाहतूक रोखण्यात आली. सिंधुदुर्गात आज एकूण25 ठिकाणी चक्काजाम करण्यात आला. दरम्यान या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांच्या रांगा

मराठा संघटनांच्या चक्काजाममुळे मुंबई आग्रा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिकच्या  सिन्नर फाटा आणि जत्रा हॉटेल चौकातही मराठा संघटनांनी चक्काजाम आंदोलन सुरु आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अशा प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. मुंबईतील प्रवेशद्वारांवर चक्काजाम आंदोलन सुरु आहे. दादरमधील चित्रा सिनेमागृह, वरळी नाका, चेंबूर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा याठिकाणी चक्काजाम केला जात आहे. यासह औरंगाबाद, नागपूर, नाशिकसह अनेक शहरात चक्काजाम आंदोलन केलं जातं आहे.