मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India) निर्देशांनंतर अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ 12 महिन्यांसाठी बरखास्त करण्यात आले. त्यातच आता सदावर्तेंच्या पॅनलची सत्ता असलेल्या एसटी बँकेच्या म्हणजेच द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या (State Transport Co Operative Bank ) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बँकेचं जे नवं संचालक मंडळ आहे, ते बँकेत सुरु असलेल्या कारभारावरुन व्यवस्थापकीय संचालकांवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हे गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांचे जवळचे नातेवाईक संचालक मंडळाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेत नवं संचालक मंडळ आल्यानंतर 466 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्या. तर त्याचा सीडी रेशो हा 95.49 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान 30 जून 2023 च्या आधी 2 हजार 311 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेत होत्या. या ठेवी नवं संचालक मंडळ बसण्याआधी होत्या. पण आता या ठेवींमध्ये घट होऊन त्या 1845 कोटींवर आल्या असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचा क्रेडिट-डिपाॅझिट रेशो हा 95.49 टक्क्यांवर आल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पैसे काढण्यावर मर्यादा येण्याची शक्यता
सर्वसाधारणपणे को- ऑपरेटिव्ह बँकेचा सीडी रेशो हा 60 ते 70 टक्क्यांमध्ये पाहायला मिळतो. पण एसटी बँकेचा हा रेशो 95.49 टक्क्यांवर पोहचलाय. त्यामुळे जर सीडी रेशोत आणखी वाढ झाली तर बचत खात्यातील पैसे काढण्यावर देखील मर्यादा येऊ शकतात. तसेच 30 जून रोजी नवे संचालक मंडळ आल्यावर एकूण कर्जे 1776 कोटी रुपये होते. पण आता तीच कर्जे 1761 कोटी रुपये झाली असल्याची माहिती देण्यात आलीये.
बँकेसाठी काही बाबी धोकादायक
द स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एकूण 50 शाखा आहेत. तसेच याचे 11 विस्तार केंद्रे आहेत आणि 62 हजार सभासद आहेत. सध्या यामधील साधारण 3 हजार सभासद निवृत्त झाले असून त्यामधील काहींना राजीनामा देखील दिलाय. त्यामुळे ही बाब देखील बँकेसाठी धोकादायक ठरु शकते. राजीनामा दिलेल्या आणि एसटीमधून निवृत्त झालेल्या अंदाजे 3 हजार सभासदांची देणी पैसे नसल्याने मिळाली नसल्याचा काही सभासदांना आरोप आहे.
बँक वाचवण्याचे प्रयत्न व्हावेत - श्रीरंग बरगे
महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'एसटी बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामावर उभी राहिली आहे.मोठ्या प्रमाणात ठेवी निघाल्याने बँक अडचणीत सापडली असून या प्रकरणी रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याचे हस्तक्षेप करावा. तसेच त्यांनी बँक वाचवण्यासाठी देखील प्रयत्न करावेत.'
तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता - संदीप शिंदे
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलं की, 'सीडी रेशो एसटी बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 95 टक्क्यांपर्यंत पोहचलाय. गुणरत्न सदावर्तेंनी बँकेत मनमानी पद्धतीनं कामकाज चालवलाय. आपल्याच मेहुण्याला त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पदावर बसवलंय. आरबीआयनं देखील त्यांच्यावर ताशेरे ओढलेत. सणासुदीच्या काळामध्ये कर्ज देणं बँखेकडून बंद झालय. बँकेचे सभासद यामुळे अडचणीत सापडलेत. ही बँक सर्वसामन्यांची असल्याने कामकाज कामकाज सुरळीत होण्यासाठी तातडीनं आरबीआय आणि सहकार खात्याने पाऊलं उचलणं गरजेचं आहे.'