मुंबई : किसान सभा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी यांनी घेतली. या बैठकीत सरकार आंदोलकांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं.


मोर्चेकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या समितीत एकूण 6 मंत्री असतील. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, पांडुरंग फुंडकर, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांचा या समितीत समावेश आहे.

उद्या दहावी आणि बारावीचा पेपर असल्याने लाखो विद्यार्थ्यांना तो पेपर देण्यासाठी सुरळीतपणे परीक्षा केंद्रांपर्यंत जाता यावे, यासाठी वाहतुकीचा कोणताही खोळंबा होणार नाही, यादृष्टीने आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

दरम्यान उद्या सोमवारी किसान सभेच्या शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला सर्व संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांना आणि सचिवांना उपस्थित राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत महसूल, कृषी, अर्थ, पणन, जलसंपदा, आदिवासी, ग्रामविकास, ऊर्जा, रोजगार हमी या विभागाच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यावर मोर्चेकरी शिष्टमंडळाशी समन्वय राखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मोर्चा रात्रीच आझाद मैदानाकडे, मुख्यमंत्री-शिष्टमंडळाची उद्या बैठक


किसान मोर्चा रात्रीच आझाद मैदानाकडे रवाना होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांची सध्या परीक्षा सुरु आहे. वाहतुकीची समस्या निर्माण होऊन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचण येऊ नये, यासाठी मोर्चा रातोरात आझाद मैदानाकडे नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात उद्या दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारच्या वतीने किसान मोर्चातील शेतकऱ्यांचं स्वागत केलं होतं. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा होईल, असं आश्वासन महाजनांनी मोर्चेकऱ्यांना दिलं. महाजनांनी विक्रोळीत मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन चर्चेचं निमंत्रण दिलं.

लेखी आश्वासनाशिवाय माघार घेणार नाही, मागण्या मान्य होईपर्यंत विधानभवनाला घेराव घालणार, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यावर, लिखित आश्वासनाच्या मागणीवर चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल, असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला.

मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकरी नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. अजित नवले, अशोक ढवळे, शेकापचे जयंत पाटील, कपिल पाटील, जीवा गावित या बैठकीला उपस्थित होते.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना तातडीने अकोल्याहून मुंबईला पाचारण करण्यात आलं. रात्री मोर्चेकऱ्यांशी होणाऱ्या संभाव्य चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी फुंडकरांना मुंबईत बोलावलं.

नाशिकमधून निघालेला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा मजल-दरमजल करत मुंबईत दाखल झाला. ठाण्यात शनिवारी रात्री घेतलेल्या मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे सोमवार 12 मार्चला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

सर्वपक्षीय पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी पाच वाजता सोमय्या मैदानावर किसान मोर्चातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते.

शेतकरी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचा मनापासून पाठिंबा असल्याचं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांच्या भूमिकेला समर्थन देण्यासाठी उभे राहतील. सामूहिक कार्यक्रम ठरल्यावर त्याच्या पाठीशी सातत्याने राहणार असल्याचं आश्वासन पवारांनी दिलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ट्वीट करुन किसान लाँग मार्चला पाठिंबा जाहीर केला. मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसने शेतकऱ्यांचं स्वागत केलं.

'शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या नाशिक मुंबई किसान लाँग मार्चला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या सरकारविरोधातील या संघर्षात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकऱ्यांशी चर्चा करावी व त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात.' असं चव्हाण म्हणाले.

https://twitter.com/AshokChavanINC/status/972730084401573888

आदित्य ठाकरेंची मोर्चेकऱ्यांशी चर्चा

कधी काळी डाव्यांचा जोरदार निषेध करणाऱ्या शिवसेनेने कम्युनिस्टांच्या नेतृत्वात निघालेल्या किसान मोर्चाला पाठिंबा दर्शवला. शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची हमी दिली.

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.

शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला होता. शेकाप नेते जयंत पाटीलही शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते.



गाण्यातून वेदनेचा हुंकार

ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर शनिवारी रात्री या सर्व शेतकऱ्यांनी विश्राम घेतला. शेकडो किलोमीटर पायी चालून आलेले हे शेतकरी मात्र थकले नव्हते. रात्री काही शेतकऱ्यांनी झोप काढली, तर काही शेतकऱ्यांनी ढोलकी, पिपाणीच्या तालावर ठेका धरला.

पायात पैंजण बांधून या शेतकऱ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. तसंच क्रांतिगीतं, पारंपरिक गीतं गाऊन क्षणभर आपला सकाळपासून आलेला शीण घालवला.



वाहतुकीत बदल

किसान लाँग मार्चमुळे मुलुंड ते सोमय्या मैदान- चुनाभट्टीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

याच कालावधीमध्ये मुंबईहून ठाण्याला जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावा मार्गे ठाणे अशी वळवण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु असताना एक मार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा असेल. मात्र यावेळी या वाहनांना वेगमर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याचे बंधन असणार आहे.

शेतकरी पदयात्रेच्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग याचा वापर करावा अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी दिली आहे.



धर्मा पाटील यांचा मुलगा मोर्चात

मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्रही गावातील 25 शेतकऱ्यांसह या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमी भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारने 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून कुणाच्या हाती फारसं काही न लागल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मागण्या काय आहेत?

-संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना, बोंडअळी व गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न

-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात

-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या

-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा

संबंधित बातम्या :


 

शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या वेशीवर


 

राज ठाकरेंचा नवलेंना फोन, किसान लाँग मार्चला पाठिंबा