पंढरपूर : दिवंगत नेते प्रमोद महाजन हे भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते. मात्र त्यांच्यानंतर खुद्द महाजन कुटुंबालाही अनेक त्रासाला सामोरं जावं लागलं, अशी खंत भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी व्यक्त केली.


‘पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमी’च्या वतीने विष्णुपंत पारनेरकर महाराज  यांच्या हस्ते पूनम महाजन यांना युवक क्रांतिवीर पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पूनम महाजन यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला.

प्रमोद महाजन यांच्यानंतर भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षात राजकीय त्रासाला सामोरं जावं लागल्याची मोठी चर्चा होती. मात्र, खुद्द प्रमोद महाजनांच्या मुलीलाही भाजपातील अंतर्गत त्रासाचा सामना करावा लागला, असा गौप्यस्फोट पूनम महाजन यांनी केला.

''वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा 2009 साली लोकसभेचं तिकीट कापलं गेलं. नंतर विधानसभा निवडणुकीत नको असलेल्या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. यात पराभूत झाल्यावर सगळ्यांनीच डावललं. मात्र यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या मतदारसंघात खूप तयारी केली, तेथून तिकिटच कापण्यात आलं. मग मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केल्यावर अडचणीच्या मतदारसंघात उमेदवारी दिली. मदत मागून कुणीही मदतीला न आल्यावर आपण या मतदारसंघात नवीन टीम तयार करून जिद्दीने निवडणूक लढवली आणि जिंकली,'' अशा शब्दात पूनम महाजन यांनी आपल्याच पक्षाकडून झालेल्या अन्यायाबाबत खंत व्यक्त केली.

वडिलांच्या पुण्याईने आणि शिकवणीमुळे त्या विजयानंतर आपण कधी मागे वळून पहिलंच नसल्याचं पूनम महाजन यांनी सांगितलं. वडिलांना गोळ्या घातल्यावर त्यांच्या डोळ्यातील त्यावेळचे आश्चर्याचे भाव आपण अजूनही विसरू शकत नसल्याचं सांगत वडिलांचे मोठेपण आता देशभर फिरताना पदोपदी जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

एकनाथ खडसे नाराज असल्याचं कधी जाणवलं नाही : पूनम महाजन

दरम्यान, एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत का, या प्रश्नावरही पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. ते नाराज असल्याचं आपल्याला कधीही जाणवलं नसून उलट त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून न्याय द्यावा, असं पूनम महाजन यांनी सांगितलं. राज्यातील भाजपचे सर्वात मजबूत संघटन असलेला जळगाव हा एकमेव जिल्हा असल्याचंही त्या म्हणाल्या.