मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उद्या मुंबई उच्च न्यायालयात यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. कामगार संघटनेला या संपावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. शुक्रवारच्या सुनावणीत या संपवार तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती एस. तावडे यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं स्पष्ट केलं की, सणासुदीच्या काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं योग्य नाही. त्यामुळे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले.
कामगार तातडीनं हा संप मागे घेत असतील तर राज्य सरकारला तुमच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश देऊ, असं आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आलं. मात्र राज्य सरकारी सेवेत सामावून घ्या या प्रमुख मागणीसह संप करणारे कामगार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पुढेही जर संपवावर गेलेल्या एस.टी. कर्मचारी संघटनेचे नेते आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असतील तर त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश देऊ, हायकोर्टाचा स्पष्ट इशारा न्यायमूर्ती एस. काथावाला यांनी दिला.
जर एस.टी. कामगारांच्या इतर संघटना आमचे आदेश मान्य करत असतील तर केवळ तुमची संघटना ते मान्य का करत नाही?, असा संतप्त सवालही हायकोर्टानं कामगारांना केला. तेव्हा आपापसात चर्चा करून ताबडतोब निर्णय कळवण्याचे निर्देश कोर्टाकडून संघटनेला देण्यात आलेत. शनिवारी दुपारी यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.
दरम्यान एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप लावून धरलेल्या कनिष्ट वेतन श्रेणी कामगार संघटनेचे नेते अजयकुमार गुजर हायकोर्टाच्या समन्सनुसार शुक्रवारच्या सुनावणीत हजर कोर्टासमोर हजर झाले. न्यायालयानंही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र गुजर आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. एस.टी. महामंडळाच्यावतीनं अॅड. जी.एस. हेगडे आणि अैड. पिंकी भन्साली यांनीही कामगारांना त्यांचं हित समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तेव्हा आता शनिवारच्या सुनावणीत कामगार संघटनेचे नेते कोर्टात काय भुमिका मांडतात यावर त्यांचं आणि या संपाचं भवितव्य अवलंबून आहे.
महत्वाच्या बातम्या :