ST Workers Strike updates :  मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने दिलेली वेतनवाढ व इतर मागण्यांवर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. एसटी कामगारांनी उभारलेल्या लढ्याला मोठं यश आले असल्याचे सांगत एसटी कामगारांचे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. पुढील निर्णय कामगारांनी घ्यावा असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले. 



राज्य सरकारने, एसटी महामंडळाने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर झाली केली होती. त्यानंतर संप मागे घेतला जाणार का याबाबत चर्चा सुरू झाली. गुरुवारी भाजप आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केली. एसटी कर्मचाऱ्यांनी उत्सुर्फपणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी उतरलो होतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळाली आहे. त्याशिवाय या आंदोलनातील एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याची महत्त्वाची मागणी होती. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टासमोर आहे. आंदोलनातील पहिल्या टप्प्यात मिळालेले यश मोठे असल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आंदोलनात उतरलो होतो, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. एसटी संप आम्ही चिघळवला असल्याचा आरोप निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीला न्याय देण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करत होतो असेही पडळकर यांनी म्हटले. 


पाहा: एसटी आंदोलनातून संप मागे घेताना भाजप आमदार सदाभाऊ खोत काय म्हणाले?




एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम


एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.  आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजु व्हा, नाहीतर परवापासून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार आहे.  जे कर्मचारी निलंबीत झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे घेण्यात येणार आहे.  मात्र, परवापासून कामावर रुजु न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संपावर असलेल्या मात्र, निलंबनाची कारवाई न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधातही परवापासून कारवाई करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


इतर संबंधित बातम्या: 
ST Workers Strike : एसटी संपाबाबत सरकारची घोषणा; एबीपी माझाचा अंदाज ठरला खरा, संप मिटणार?


ST Workers New Salary : 3 ते 5 हजार रुपये वाढीसह अन्य भत्ते, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ?