ST Strike  : गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी राज्य सरकारने आज महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात आता वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ही घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली असून यावेळी मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. 


एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसं असेल? जाणून घ्या


1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.


2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.


3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.


4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे. 


संपकरी राज्य सरकारचा प्रस्ताव स्वीकारणार का?


राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेला प्रस्ताव आता आझाद मैदानात संप करणारे कर्मचारी स्वीकारतील का हे थोड्याच वेळात समजणार आहे. याबाबतीत आ. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना विचारलं असता त्यांनी संपकऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं.


विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. सरकारने या समितीसमोर काय भूमिका मांडावी याबाबतही चर्चा झाली. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, त्याबाबतचा अहवाल येणार आहे, तो अहवाल आम्ही स्वीकारु असं अनिल परब यांनी सांगितलं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha