मुंबई : राज्यात गेल्या 54 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अजय गुजर प्रणित कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने या संपातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेची आज बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली आहे. 


गेले 54 दिवस एसटी संप सुरु आहे. संपकरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. आज महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेनं आज परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे  मंत्रालयात चर्चा केली. त्यामुळे आता 22 डिसेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावं असे आवाहन कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी केलं आहे. मुंबईबाहेरचे कामगार, जे मुंबईत आंदोलनासाठी आले आहेत त्यांना कामावर रुजू होण्यासाठी अतिरिक्त दोन दिवस देण्यात आले आहेत. 


...तर दुसरा वकील बघू
एकीकडे कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे अॅड. गुणरत्ने सदावर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरणाची मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका सदावर्तेंनी घेतली आहे. त्यावर बोलताना अजय गुजर म्हणाले की, "आम्ही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहोत, पण समितीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील आहेत. जर त्यांना आमची भूमिका मान्य नसेल, त्यांना आमची केस लढायची नसेल तर आम्ही दुसरा वकील बघू."


अनिल परब म्हणाले की, "एसटी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर न्यायालयाच्या समितीचा निर्णय संपकरी आणि राज्य सरकार या दोन्ही बाजूंना मान्य आहे. तसेच शासकिय कर्मचाऱ्यांमध्ये वेतन मिळण्याबाबतच्या मागणीवरही राज्य सरकार संघटनेशी चर्चा करणार आहे.  ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ते कर्मचारी जर कामावर पुन्हा रूजू  झाले तर त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जाईल. तसेच त्यांच्यावरील फौजदारी गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले आहेत त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कारवाई मागे घेण्यात येणार आहे." 


दरम्यान, कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कामगार संघटनेने संप माघार घेतल्याच्या निर्णयानंतर आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिली आहे. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नसल्याचं आंदोलकांनी सांगितलं. त्यामुळे आता एसटी कर्मचारी संपामध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे. 


संबंधित बातम्या :