कोल्हापूर :  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.  जिल्हा बँकेत स्वाभिमानीला एक जागा देतो असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील (satej patil)  यांनी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करताना दिल होते. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. आयत्या वेळी जर आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर तो खंजीर उलटा फिरवायला वेळ लागणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिलाय.


या बँकेच्या निवडणुकीवरुन पालकमंत्री सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांनी आता, शिरोळची जागा बिनविरोध करण्यासाठी स्वीकृतचा पर्याय दिला आहे. मात्र, शिरोळमधील उमेदवार काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फसवणूक केली असल्याचा आरोप शेट्टींनी केलाय. याबाबत उद्या दुपारपर्यंत आमचा निर्णय सांगू असे शेट्टींनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, जिल्हा बँकेच्या (Bank Election) निवडणुकीत आज कागल विकाससंस्था गटातून पाच उमेदवारांनी  एकाच दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या गटातून बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. कोल्हापूरचे पालकंमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पाठोपाठ मुश्रीफही बिनविरोध झाल्याने सत्तारूढ गटाला निवडणुकीपुर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून यापुर्वीच पालकमंत्री पाटील बिनविरोध विजयी झाले आहेत. कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे स्वतःचे चार तर इतर पाच उमेदवारांचे मिळून नऊ अर्ज दाखल झाले होते. अर्ज माघारी घेण्याचा २१ डिसेंबर हा  शेवटचा दिवस आहे.


दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरचे राजकारण पुन्हा तापले आहे. आत्तापर्यंत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे बाकीच्या जागांवर निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चितच झाले आहे. या निवडणुकीमुळे कोल्हापुरातील गट तटाचे राजकारण पाहायला मिळत आहे. मात्र, उद्या राजू शेट्टी नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: