Sameer Wankhede Birth Certificate : मुंबई क्रूझ प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याशिवाय समीर वानखेडे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी मिळवल्याचा आरोपही मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला सार्वजनिक करत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. आता यावर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला ट्वीटरवर पोस्ट केला. क्रांती रेडकर यांनी काही वेळानंतर आपली पोस्ट डिलीट केली. मात्र, समीर वानखेडे यांचा हा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


गेल्या काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मप्रमाणपत्राची प्रत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्या वडिलांचं नाव ‘दाऊद क. वानखेडे’ असं लिहिण्यात आलं होतं. आणि धर्माच्या जागी मुस्लीम असं लिहिल्यालं होतं. मलिकांच्या या आरोपाला उत्तर देताना क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला पोस्ट केलाय.  


क्रांती रेडकर यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला :






नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्माचा दाखला :






दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्ट्राचार आणि वसूलीचे आरोप झाले होते. पंच प्रभाकर साईल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन किरण गोसावीनं शाहरुखच्या मॅनेजरकडून 25 कोटींची मागणी केली होती. मात्र, 18 कोटींवर डील ठरली होती. यामधील आठ कोटी समोर वानखेडेंना देण्यात येणार होतं, असं खळबळजनक वक्तव्य केलं होतं. बोगस प्रमाणपत्राच्या आरोपावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वानखेडे यांना पाठींबा दर्शवला होता.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha