(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Strike : कर्मचारी विलिनीकरणावर ठाम; एसटी कामगार संघटना कृती समितीची अनिल परब यांच्यासोबत बैठक होणार
एसटी कामगार संघटना कृती समिती एसटीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून यावर आज संध्याकाळी पाच वाजता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक होणार आहे.
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली वेतनवाढ आणि कामावर हजर राहण्याचे अल्टिमेटम दिल्यानंतर आता कर्मचारी हळूहळू कामावर परतत आहे. पण एसटी कामगार संघटना कृती समिती अद्याप विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असून या प्रश्नी आज संध्याकाळी पाच वाजता ते परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी अनिल परब यांची त्यांच्या बांद्रा इथल्या कार्यालयात भेट घेवून वेतनवाढीतल्या तफावतीचा प्रश्न कानावर घातला होता. विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याची कामगार संघटनांची भूमिका कायम आहे. आता यावर ते पुन्हा एकदा अनिल परब यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायालयाच्या कक्षेत असून या प्रकरणी नेमलेल्या समितीला 12 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या समितीचा जो काही निर्णय असेल त्याला राज्य सरकार मंजुरी देईल असं अनिल परब यांनी सांगितलं आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा म्हणून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन कसं असेल? जाणून घ्या
1. नवीन कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरासरी 5000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनामध्ये 7,200 रुपये वाढ होतील.
2. दहा वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 4000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या मूळ वेतनात 5,760 रुपये वाढ होतील.
3. ज्या कर्मचाऱ्यांची 20 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे त्यांच्या मूळ वेतनात सरासरी 2,500 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे इतर भत्त्यासह त्यांच्या वेतनात 3,600 रुपयांची वाढ झाली आहे.
4. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 30 वर्षे किंवा त्याहून जास्त झाली आहे त्यांच्या मूळ वेतनामध्ये सरासरी 2,500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना इतर भत्त्यासह 3,600 रुपयांची वाढ मिळणार आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha