मुंबई : राज्यात सुरु असलेल्या एसटी संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता असून विलिनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती आहे. आता या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.


एसटीचे शासनाच्या सेवेत विलिनीकरण करण्यात यावं यासाठी गेले अनेक दिवस एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. विलिनीकरणाचा प्रश्न हा न्यायालयासमोर असून समितीच्या अहवालानंतर यावर निर्णय होणार आहे. पण तोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी शिष्टमंडळामध्ये यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. 


शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले. त्यावेळी या प्रस्तावाला अजित पवारांनी मान्यता दिल्याची माहिती आहे. त्यानंतर याला अंतिम मान्यता मिळवण्यासाठी अनिल परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. या पगार वाढीनंतर एसटी महामंडळ आणि राज्य सरकारवर वर्षाला  600 कोटींचा भार येणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगार वाढ देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे.


ST संप संदर्भात वेगवान घडामोडी सुरु
परिवहन मंत्री अनिल परब आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबतची बैठक संपवून आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी HN रिलायंन्स हाँस्पिटलमध्ये गेले आहेत. ST कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी निर्माण केलेला नवीन प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येईल. आणि त्यानंतर पत्रकार परीषद घेऊन ST संपा संदर्भात मोठी निर्णायक घोषणा जाहीर केली जाईल.


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha