चिपळूण : कोकणातून प्रवास करताय तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट सध्या खचतोय आणि ढासळतोय. या खचलेल्या घाटातून सध्या जीवघेणा प्रवास सुरु आहे. मुंबई गोवा महामार्ग कोकणच्या नागमोडी वळणाचा. डोंगरदऱ्यातून तयार केलेला हा महामार्ग. काही वर्षांपूर्वी याच महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी अडचणी आल्या. त्यापैकी एक म्हणजे चिपळूणचा परशुराम घाट. या घाटात चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले. त्यानंतर त्या जमिनीचा मोबदला जाहिर करण्यात आला. सध्या मोबदल्यावरुन परशुराम देवस्थान, कूळ, गावकरी यांच्यात वाद आहेत. 


जमीनदारांच्या मोबदल्याचा गुंता अजूनही न सुटल्याने चौपदरीकरण रखडलेले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यातच आता काही ठिकाणी रस्ता खचू लागल्याने हा मार्ग धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. 


विशेष म्हणजे प्रामुख्याने हा भाग चिपळूण विभागाकडे न येता तो महाड राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येतो. कल्याण टोलवेज कंपनी मार्फत हे काम केले जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकदा पोलिस फौजफाट्यात काम सुरु करण्याचा प्रयत्न झाला होता. 


पावसाळ्यात परशुराम घाटातील दरड कोसळून पाया लगतच्या पेढे गावातील तीन जणांचा मृत्यू झाला होता. तसेच येथील सहा घरांना फटका बसला होता. मात्र अजूनही धोका कायम आहे. या घाटाच्या खालील बाजूला मोठी वस्ती आहे. या घरांसाठी दिवसेंदिवस धोका वाढत चालला आहे. त्यामुळे याप्रश्नी प्रशासनाने वेळीच लक्ष घालून ठोस निर्णय देण्याची मागणी केली जात आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही चौपदरीकरणाला विरोध करणार असे इथले गावकरी सांगतात. 


जिल्हाधिकारी यांच्याकडून कुळ व देवस्थानसाठी 90-10 प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र या दोन्ही प्रस्तावांवर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे पेढे परशुराम ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला. 


या मार्गावरून सतत वाहनांची वर्दळ सुरु असते.  त्यामुळे या भागाकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा भाग कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. चौपदरीकरणाच्या मोबदल्यावरुन या दोघांमधील वाद मिटो न मिटो पण घाटातील महामार्गाचे काम सध्या स्थिती पाहता पूर्ण होणे गरजेचे आहे.  जमीन मोबदल्याच्या नादात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.