ST Strike Timeline : एसटी संपाचा तिढा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं सोडवल्यानंतरही मुंबईच्या आझाद मैदानातील कर्मचारी संपावर ठाम आहेत. आझाद मैदानात आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ला, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली आहे.
एसटी संपाचा तिढा न्यायालयानं सोडवला
एसटी संपाचा तिढा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानं सोडवला. संपकऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले. मात्र संपकरी कर्मचाऱ्यांनीही तातडीनं कामावर रुजू व्हावं असं स्पष्ट करत यासाठीच्या मुदतीत आठवड्याभराची वाढ करत 15 ऐवजी 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना संधी दिली आहे. मात्र त्यानंतरही जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाहीत, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभा एसटी महामंडळाला असेल असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय. कामगारांची विलीनीकरणाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही मात्र थकीत वेतन, निवृत्ती वेतन, ग्रॅज्युटी आणि इतर भत्ते तातडीनं देण्याचे निर्देश एसटी महामंडळाला देत न्यायालयाने ही याचिका आता निकाली काढली. हायकोर्टाच्या या निर्देशांनंतर कामगारांनी समाधान व्यक्त करत आझाद मैदानात गुलाल उधळत जल्लोष सुरू केला. कारण कारवाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरून आता दूर झालेली आहे.
एसटी महामंडळाचे परिपत्रक जारी, निलंबनाची कारवाई मागे
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरची कारवाई मागे घेण्याबाबत अखेर एसटी महामंडळाने परिपत्रक काढलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेली निलंबनाची तसेच बदली याबाबतची कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने परिपत्रक काढलंय. या पत्रकानुसार जे कर्मचारी रुजू होवू इच्छितात त्यांना तत्काळ कामावर रुजू करून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. ज्या कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, ज्यांची निलंबनाची कारवाई किंवा कारवाईची नोटीस देण्यात आली, ती मागे घेण्यात आली आहे.
अजित पवार यांनी दिला होता इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की, 31 तारखेपर्यंत सगळ्या कामगारांना कामावर परतण्याची संधी द्यावी, अशी सगळ्यांची भूमिका होती. त्यानुसार सरकारने विचाराअंती कामगारांना परत कामावर परतण्याची संधी दिली. वेळोवेळी कामावर परतण्यासंबंधी आवाहन केलं. तत्पूर्वी काही कामगार देखील कामावर परतले. पण अजूनही काही कामगार संपावर ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर रुजू व्हावं अन्यथा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करुन त्यांच्या जागी नवीन कामगार भरती करण्यात येईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती.
संप मागे घेतल्याशिवाय कोणतीही चर्चा नाही : अनिल परब
परिवहनमंत्री अनिल परब यांनी अधिवेशनात सांगितलं होतं की, संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही. 31 तारखेपर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावे. एसटी कामगारांच्या आर्थिक बाबींबाबत शासन निर्णय घेईल. कामगारांना आर्थिक वाढ दिलीच आहे. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सातवा वेतन आयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही. इतर मागण्यांबाबत चर्चेची तयारी आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.
एसटी संपाला सुरुवात कधी झाली?
विविध मागण्यांसाठी एसटीतील 23 कामगार संघटनांची कृती समिती स्थापन करण्यात आली. या कृती समितीने 27 ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण सुरू केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्त्याची मागणी मान्य झाल्याने कृती समितीने 28 ऑक्टोबर रात्रीपासून उपोषण मागे घेतले. परंतु विलिनीकरणाच्या मुद्यावर कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला. कृती समितीतील 23 कामगार संघटनांनी विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला असला तरी 22 संघटना संपात सहभागी झाल्या नाही. संघर्ष एसटी कामगार संघटनांनी संप सुरुच ठेवला.
20 डिसेंबरला झाली होती संप मागे घेण्याची घोषणा
राज्य सरकारसोबत झालेल्या बैठकीनंतर 20 डिसेंबर रोजी 54 दिवसांच्या आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मिटल्याचं म्हटलं होतं. राज्य सरकारने संप मिटल्याचं जाहीर करत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. मात्र, सरकारच्या घोषणेनंतरही एसटी कर्मचारी कामावर रूजू झाले नाहीत. मुंबईच्या आझाद मैदानात संपात सहभागी असलेले कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम होते. कर्मचारी संघटनांशी आमचं देणं-घेणं नाही. प्रत्येक कर्मचारी या आंदोलनात स्वेचछेने भाग घेतोय. कोणीही कामावर येणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. नंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले.
एसटी कर्मचारी संपावर ठाम
एसटी संघटनांनी संप मागेस घेतल्यानंतरही एसटी कर्मचारी संपावर ठाम होते. सरकार आणि एसटी संघटनेने संप मिटल्याची केलेली घोषणा एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नव्हती. त्यामुळे सरकारच्या घोषणेनंतरही मुंबईतील आझाद मैदानात शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्यावर आंदोलन कायम ठेवले. याशिवाय राज्यभरात अनेक डेपोमध्ये कर्मचारी संपावर ठाम होते. यामुळे गावखेड्यातील प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ST Strike : एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढलं! आंदोलकांचा CSMT स्थानकात ठिय्या
- Gunratna Sadavarte Arrest : अॅड गुणरत्न सदावर्तेंना अटक, तब्बल चार तास वैद्यकीय तपासणी, रात्रभर काय काय घडलं?
- Jammu Kashmir Encounter : दक्षिण काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक, अनेक भागात इंटरनेट बंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha