Beed: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासांठी संप सुरु केला आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी संप सुरु आहे. एसटीचे कर्मचारी 27 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने बीड बस आगाराच्या गेटवरच एका चालकानं विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. हा प्रकार तात्काळ इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या कर्मचाऱ्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.


अमोल कोकटवाड असे विष प्राशन केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोकटवाड मूळचे परभणीचे आहे. ते बीड आगारात गेल्या दोन वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी तेही काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले. परंतु, मागण्या मान्य होत नसल्यानं त्यांनी विष प्राशन केल्याचं सांगण्यात येतंय. हा प्रकार इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांना  बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


हिंगोलीत वाहकाचं आत्महत्येचा प्रयत्न-


एसटी कर्मचाऱ्यांचा संप राज्यातील 59 पेक्षा अधिक आगारांमध्ये आंदोलन सुरु आहे. आंदोलनाकडे कुणीच लक्ष देत नसल्याने कळमनुरी आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. रमेश टाळीकुटे असं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांच्यावर हिंगोलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. 


एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या-


- एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे.
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28 टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.
- न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला वेतन देण्यात यावं.
- वाढीव घरभाडे 8, 16, 24 या दराने देण्यात यावं.
- वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांऐवजी 3 टक्के देण्यात यावी.
- सर्व सणांना 12 हजार 500 रुपये उचल मिळावी.
- प्रलंबित वेतन वाढ देण्यात यावी. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात यावी, यासह ईतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत.


हे देखील वाचा-