Mumbai Drugs Case Exclusive : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसुझा आणि मोहित कंबोज यांनी ज्याच्यावर आरोप केले होते त्या सुनिल पाटील यांनी एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. आर्यन खान केस प्रकरणाशी आपला काही संबंध नाही, आपण फक्त यामध्ये 50 लाखाची डील केली होती असा गौप्यस्फोट सुनिल पाटील यांनी केला. मनिष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच या प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा दावा सुनिल पाटील यांनी केला आहे. 


मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी सुनील पाटील हे मास्टरमाईंड असून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचा कार्यकर्ता आहे, अनिल देशमुखांच्या मुलाशी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला होता.


सुनिल पाटील म्हणाले की, "किरण गोसावी याला आपण 22 सप्टेंबरला पहिल्यांदा भेटलो.  27 तारखेला मनिष भानुशाली यांच्यासोबत मी अहमदाबादला गेलो. ड्रग्ज प्रकरणी मला टीप मिळाली नव्हती तर ती मनिष भानुशालीला मिळाली होती. निरज यादव हा मध्य प्रदेशमधील भाजपचा कार्यकर्ता असून त्याने आपल्याशी संबंध साधला होता. सॅम डिसुझाला चार महिन्यापूर्वी एका ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने समन्स पाठवलं होतं. त्यावेळी त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना 25 लाख रुपये देणार असल्याचं सांगितलं आणि त्यानंतर तो या प्रकरणातून सुटला."


सुनिल पाटील म्हणाले की, "हे प्रकरण मला माहित असल्याने मी सॅम डिसुझाचा नंबर दिला. मी त्यावेळी अहमदाबादला असल्याने मला काही जास्त माहिती नाही. या प्रकरणी किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांनी 50 लाखांचं टोकण मिळालं असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सॅमचा मला फोन आला आणि ही डील रद्द केली असल्याची माहिती दिली आणि पैसे परत घेत असल्याचं सांगितलं."


कोण आहेत सुनील पाटील?
सुनील पाटील हे धुळ्याचे रहिवाशी असल्याची माहिती आहे. ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.  बबनराव पाचपुते जेव्हा 2009 ते 2014 मध्ये NCP मधून आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले होते. त्यावेळी ते त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसायचे असं सांगितलं जातं.


भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झालेल्या शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांच्याशी देखील सुनील चौधरी पाटील यांची जवळीक होती. मात्र नंतर मेटेंशी काही वाद झाल्यानं त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. सुनील पाटील यांचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संबंध आहेत असा आरोप केल्यानंतर आता सुनील पाटील यांचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुनील पाटील भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्या सोबत आहे तर दुसऱ्या फोटो मध्ये मनीष भानुशाली आणि सुनील पाटील एकत्र दिसतायंत. 


महत्वाच्या बातम्या :