मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे काही काळासाठी एकांतवासामध्ये जात आहेत. तसं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून सांगितलं आहे. शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी मनन आणि चिंतनाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि फेरविचार करणार असल्याचं त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे. 


काही काळ आपला कुणाशीही संपर्क होणार नसल्याची फेसबुक पोस्ट अमोल कोल्हे यांनी केलीय. शारीरिक आणि मानसिक थकव्यामुळं आपण हा निर्णय घेत असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. काही निर्णयांचा विचार करण्यासाठी आणि कदाचित फेरविचार करण्यासाठी आपल्याला एकांत हवा असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. त्यामुळं कोल्हे कुठल्या निर्णयाचा फेरविचार करणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.


डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून ही माहिती दिली आहे. त्यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय आहे ते त्यांच्याच शब्दात पाहू,


"सिंहावलोकनाची वेळ:- गेल्या काही दिवसांत, महिन्यांत, वर्षांत बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले, अनपेक्षित पावलं उचलली.  पण हे सगळं जुळवताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळे जरा थकवा आलाय..थोडा शारीरिक, बराचसा मानसिक! शारीरिक थकवा आरामाने निघून जाईल पण मानसिक थकवा घालवण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन! 


घेतलेल्या निर्णयांचा विचार, आणि कदाचित फेरविचार सुद्धा!


त्यासाठीच एकांतवासात जातोय.. काही काळ संपर्क होणार नाही! पुन्हा लवकरच भेटू...नव्या जोमाने, नव्या जोशाने!!


टीप:- फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही😜"


">


महत्वाचं म्हणजे त्यांनी आपण फक्त चिंतनासाठी चाललोय, चिंतनशिबिरासाठी नाही असं स्पष्ट केलं आहे. 


डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाचा विचार आणि फेरविचार करणार असल्याचं सांगितलं आहे. आता हे नेमके निर्णय कोणते हे अद्याप स्पष्ट झालं नाही. अभिनय क्षेत्रातून राजकारणात येण्याच्या निर्णयाचा ते फेरविचार करणार आहेत का असाही प्रश्न यानिमित्ताने काही जणांना पडला आहे.