मुंबई: देशभरातल्या पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती पाहता नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. सरकार नागरिकांना इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.एसटीच्या ताफ्यात देखील पाच हजार ई-बसेस (E- Buses) दाखल होणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) ताफ्यात दाखल होणाऱ्या या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. कारण याबाबतची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात राज्य सरकारडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच ही समिती बसगाड्यांचे प्रवास भाडे कमी करण्यासंदर्भातला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. ई बसचे भाडे कमी होणार असल्याने प्रवाशांना स्वस्त दरात आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे.
राज्य सरकारकडून समिती स्थापन
दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक बस दाखल करण्यात आल्या आहे. एसटी महामंडळाकडून ईव्ही गाड्यांच्या प्रवास भाडेसंदर्भात राज्य सरकारला समिती बनवण्याची शिफारस करण्यात आली. राज्य सरकारकडून समिती स्थापन करत ईव्ही बसगाड्यांचे प्रवास भाडे कमी करण्यासंदर्भातला निर्णय होणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार ईव्ही गाड्या येत्या काही वर्षात दाखल होणार आहे. ईव्ही बसगाड्या दाखल होत असताना त्याचे प्रवास भाडे किती असेल असा प्रश्न होता, त्यात यासंदर्भात समितीकडून निर्णय घेतला जाणार आहे.
ओलेक्ट्रा कंपनीला पाच हजार गाड्यांचे टेंडर
एसटीच्या ताफ्यात दोन प्रकारच्या ईव्ही बसगाड्या येत्या काही वर्षात दाखल होणार आहेत. या ताफ्यात 9 मीटर आणि 12 मीटर लांबीच्या दोन गाड्या असणार आहेत. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ओलेक्ट्रा कंपनीच्या पाच हजार ईव्ही गाड्या असणार आहे. ओलेक्ट्रा कंपनीला पाच हजार गाड्यांचे टेंडर आणि वर्क ऑर्डर देखील मिळालं असल्याची माहिती मिळाली आहे. ओलेक्ट्रा कंपनीकडून येत्या दोन-तीन महिन्यात एसटी महामंडळाला प्रोटोटाइप डिझाईन दाखवलं जाणार आहे. एसटी महामंडळाकडून प्रोटोटाइपला हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोन वर्षाच्या काळात पाच हजार इलेक्ट्रीक बसगाड्या दाखल होणार आहेत.
दरम्यान, 'जिथे गाव, तिथे एसटी' अशी संकल्पना अनेक वर्षांपूर्वी एसटी महामंडळाने राबवली होती. त्यानुसार आज प्रत्येक गावागावात एसटी सहज बघायला मिळते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :