Maharashtra Latur News: मनोज जारांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल (मंगळवारी) रात्री उशीरा ते लातूर जिल्ह्यातील (Latur District) अहमदपूर येथे दाखल झाले. लातूर जिल्ह्यात जरांगेंचा दोन दिवसांचा दौरा आहे. आज संध्याकाळची सात वाजता सभेची वेळ ठरली होती. मात्र मनोज जारांगे पाटील यांना अहमदपूर येथे येण्यासाठी पाच तास उशीर झाला होता. त्यामुळे संध्याकाळी सात वाजता ठरलेली सभेला फार उशीर झाला. रात्री साडेदहाला मनोज जारांगे पाटील हे अहमदपूर येथे दाखल झाले. पाच तास उशीर झाल्यानंतरही अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजारोच्या संख्येनं लोक हजर होते.


मी खूप थकलोय पण तुमच्यामुळे ऊर्जा मिळाली : मनोज जरांगे पाटील 


काल (मंगळवार) सकाळपासून सुरू असलेल्या दौऱ्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मनोज जारांगे पाटील यांचा स्वागत करण्यात आलं. त्यामुळे अहमदपूर येथे येण्यास उशीर झाला होता. सकाळपासून लोकांचं प्रेम मिळत आहे. मी थकून गेलो होतो, मात्र पाच तास वाट पहात थांबलेल्या हजारो लोकांमुळे मला ऊर्जा मिळाली आहे. असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली.


वाट पाहून कंटाळले असाल भाषण थोडक्यात करतो : मनोज जारांगे पाटील


पाच तास झाले माझी वाट पाहत आहात. यामुळे तुम्ही कंटाळले असाल, मी आता थोडक्यात भाषण करतो, अशी भूमिका मनोज जारांगे पाटील यांनी घेतली होती. मात्र हजर असलेल्या लोकांनी एकतास भाषण करा असा सूर आळवला लावला. त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी तब्बल 45 मिनिटं भाषण केलं.


आरक्षण समजून सांगायला आलोय : मनोज जरांगे पाटील 


मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल याची माहिती देण्यासाठी मी आलो आहे. त्यासाठी कोणते निकष आहेत? याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. आपण वेळ दिला नसता तर मराठा समाजावर खापर फुटलं असतं, टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर चाळीस दिवसांचा वेळ दिला पाहिजे होता, तो आपण दिला आहे. आरक्षण शिकून घ्या, समजून घ्या, आपल्यात एकमेकांना शिकवत नाहीत, शिकला तर आपल्याकडे येणार नाही, असं वाटतं काही लोकांना. सर्व पक्षांना विनंती करतो, सगळे एक व्हा, मराठा आरक्षण द्या... आपल्यातील मतभेद दूर ठेवा. सरकार एखादा डाव करण्याची शक्यता आहे, आपल्यात गट पाडू शकते, त्यामुळे सावध राहा. आरक्षण मिळेपर्यंत लढत रहा. जाळपोळ उद्रेक होऊ देऊ नका, आंदोलन शांततेतच करा, असं आवहन त्यांनी यावेळी केलं आहे.


दरम्यान, रात्री साडेदहाला सुरू झालेली सभा साडेअकरा वाजता संपली. मात्र इतका उशीर झाल्यावर ही हजारो लोकांनी प्रतिसाद देत हजेरी लावली होती. आज दिवसभर मनोज जारांगे पाटील हे लातूर जिल्ह्यातील चाकूर लातूर पाखर सांगवी येथे भेटी देणार आहेत. आज संध्याकाळी लातूर जिल्ह्यातील गादवड येथे जाहीर सभा होणार आहे.