जून महिन्याच्या आठ आणि नऊ जून असा दोन दिवसांचा अघोषित संप पुकारण्यात आला होता. संप कालावधीत गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाच्या गैरहजेरीपोटी आठ दिवसांची वेतन कपात करण्यात येणार आहे. ही वेतन कपात सप्टेंबर महिन्यापासून प्रत्येक महिन्याला एक दिवस याप्रमाणे पुढील आठ महिने होणार आहे.
केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एसटीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या अर्ध्या दिवसाची वेतन कपात ही ऑगस्ट महिना म्हणजे चालू महिन्याच्या वेतनातून होणार आहे. यासंदर्भात एसटी प्रशासनाने एका परिपत्रकांन्वये आदेश जारी केले आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीच्या मागणीवेळी तोट्यात असलेल्या एसटी प्रशासनाने केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीसाठी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच तत्परता आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रश्नावेळी का दाखवत नाही, असा सवाल एसटी कर्मचारी करत आहे.
एकीकडे पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून वेतन कपात, दुसरीकडे संप पुकारला कोणी आणि शिक्षा कोणाला? संपाच्या कालावधीत गैरहजर असलेला कर्मचारी दोषी कसा? तो कर्मचारी गैरहजर का होता? याची कारण मीमांसा न करता गैरहजेरीपोटी आठ दिवसांची वेतन कपात हा कुठला न्याय आहे? असा सवाल एसटी कर्मचारी दबक्या स्वरात उपस्थित करत आहेत.
केरळ पूरग्रस्तांसाठी एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांनी 10 कोटींची मदत दिली आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला होता.