मुंबई : विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील आठ लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांची निम्मी फी परत करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्यासंदर्भात आज अध्यादेश निघण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेत काल (29 ऑगस्ट) पार पडली.
"मराठा समाजातील आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना 605 अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय घेतला आहे. असे प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जवळजवळ सर्वच संस्था, महाविद्यालयांनी निम्मे शुल्क भरून प्रवेश दिले आहेत. तरीही ज्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शुल्क भरून प्रवेश दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयांना देण्यात येणारी उर्वरित रक्कम महाडीबीटीमार्फत वितरीत करण्यात यावी.", असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश देताना संपूर्ण शुल्क भरलेल्या मराठा समाजातील आठ लाखांच्या आतील वार्षिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेमधील (सारथी) पदे तातडीने भरण्यात यावीत. तसेच सारथीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठी तातडीने सुरू करण्यात यावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
कृषी विषयक 27 अभ्यासक्रम
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीला मराठा समाजाच्या तरुणांसाठी कृषी विषयक 27 अभ्यासक्रम राबविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळणार असून त्यातून अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावी. तसेच स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
सांगली आणि कोल्हापुरात वसतिगृह सुरु : चंद्रकांत पाटील
राज्य शासनाच्या वापरात नसलेल्या इमारती ताब्यात घेऊन कोल्हापूर, सांगली येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यात लवकरात लवकर वसतीगृहे सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. येत्या काही दिवसात ही वसतीगृहे सुरू होतील. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मूक मोर्चे ते ठोक मोर्चे.... नंतर सरकारला जाग
गेल्या दोन वर्षात मराठा समाजाकडून आरक्षणासाठी मूक मोर्चे काढण्यात आले. त्यानंतरही सरकारच्या कानी आपला आवाज पोहोचत नाही, हे कळल्यावर मराठा समाजाने आंदोलन आक्रमक करण्यास सुरुवात केली आणि ‘ठोक मोर्चे’ काढण्यास सुरुवात केली. या मोर्चांदरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत, नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठीची कायदेशी प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं आश्वासन दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचे ठरवले.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी परत मिळणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Aug 2018 08:05 AM (IST)
आरक्षण, नोकरभरती आणि फी सवलतीच्या मुद्द्यांवरुन राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला होता. याची दखल घेत सरकारकडून हा अध्यादेश काढला जाण्याची शक्यता आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -