मुंबईः दहावीच्या गुणपत्रिकेवरील ‘नापास’ किंवा अनुत्तीर्ण हा शेरा आता कायमचा पुसला जाणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘कौशल्य विकास अभ्यासक्रमांसाठी 'पात्र’ असा शेरा देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.


 

जुलैमध्ये झालेल्या फेर परीक्षेच्या गुणपत्रकांवर हे नवे शेरे देण्यात येणार आहेत. या परीक्षेचा निकाल मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर झाला असून उत्तीर्ण झालेले आणि एटीकेटीची सवलत घेऊन अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 18 हजार आहे.  39 हजार 994 विद्यार्थी या परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झाले आहेत.

 

काय आहे नवीन नियम?

 

दहावीच्या गुणपत्रकावरून यापुढे ‘नापास’, ‘अनुत्तीर्ण’ किंवा ‘फेल’ हे शब्द कायमचे हद्दपार करण्यात आले आहेत. नव्या शेऱ्यांनुसार उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘उत्तीर्ण’ असा शेरा येणार आहे. एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर एटीकेटी सवलतीसह अकरावी प्रवेशास पात्र असा शेरा येणार आहे.

 

नियमित परीक्षेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदाच दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी दोन पेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाले असतील तर त्यांच्या गुणपत्रकावर ‘फेर परीक्षेसाठी पात्र’ असा शेरा येणार आहे. फेर परीक्षेत तीन पेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर ‘फक्त कौशल्यविकास अभ्यासक्रमासाठी पात्र’ असा शेरा येणार आहे.

 

काय होईल फायदा?

 

या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकेल, मात्र अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ते पात्र ठरणार नाहीत. यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा 18 जुलै ते 3 ऑगस्ट या दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्यातून 1 लाख 42 हजार 968 विद्यार्थी बसले होते. त्यातील 39 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 27.97 एवढी आहे.

 

या परीक्षेत 78 हजार 153 विद्यार्थ्यांना एटीकेटीची सवलत मिळाली. शासनाच्या या नियमामुळे 1 लाख 18 हजार 147 विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. तीनपेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाल्यामुळे 14 हजार 332 विद्यार्थी हे फक्त कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे.

 

विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास किंवा अनुत्तीर्ण असे लिहिले जाणार नाही. मात्र, त्यामुळे ज्या ठिकाणी दहावी उत्तीर्ण अशी पात्रता असेल तेथे गोंधळ होऊ शकतो. त्या पाश्र्वभूमीवर एटीकेटी मिळालेल्या किंवा कौशल्य विकासासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावर नापास असे लिहिले जाणार नसले तरीही या दोन शेऱ्यांचा अर्थ नापास असाच गृहीत धरण्यात येईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.