मुंबई : जूनचा पहिला आठवडा उजाडताच पाऊस आणि दहावीच्या निकालाचे वेध विद्यार्थी आणि त्यांच्या
पालकांना लागले आहेत. मात्र कला विषयातील वाढीव गुणांमुळे दहावीचा निकाल रखडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला यासारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अधिक गुणांची सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून ऐनवेळी घेण्यात आला. या अतिरिक्त गुणांचा समावेश विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये करण्याचे काम बोर्डाकडून सुरु असल्यामुळे दहावीच्या निकालाला उशीर होत असल्याचे सुत्रांनी सांगितलं आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यंदाही बारावीच्या निकालापाठोपाठ दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये कला गुणांचे वाढीव गुण समाविष्ट करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आल्यामुळे निकाल लावण्यास विलंब होत आहे.

7 जानेवारी 2017 रोजी कला क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुणांची सवलत देण्याचा निर्णय घेऊन त्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च 2018 मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अचानक 14 मार्च 2017 रोजी सरकारने मार्च 2018 ऐवजी मार्च 2017 पासून हा निर्णय लागू करण्याचे आदेश शासनाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले.

संबंधित बातम्या :


दहावीच्या निकालाबाबत शिक्षण मंडळाची महत्वाची घोषणा!


दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात!