मुंबई : उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात मध्यरात्री पावसानं हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. बुधवारी मध्यरात्री मुंबई शहर, मुलुंड, भांडुप, अंधेरी, जोगेश्वरी या भागात पावसाच्या सरी पडल्या, तर ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, वसई भागातही पावसानं दमदार हजेरी लावली.


हवेत गारवा निर्माण झाल्यानं सकाळी सकाळी नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. तसंच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळही उडाली. मुंबईतल्या इतर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावासानं झोडपायला सुरुवात केली आहे. मुंबईसह औरंगाबादच्या हर्सुल, चितेगाव आणि बिडकीनमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली.

कचनेर फाट्याजवळही पाऊस सुरु असून, शिरुर आणि वैजापूरमध्ये वादळीवाऱ्यासह सरी कोसळत आहेत.
पावसामुळे मालेगावातील शहर बस स्थानकात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. याशिवाय
मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, बीड आणि परभणीमध्येही मान्सूनपूर्व पावासाचा लपंडाव सुरू आहे. तिकडे
नाशिकमध्ये दोन दिवसांपासून ये-जा करणाऱ्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.

उकाड्यानं हैराण झालेल्या अकोल्याला बुधवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. तर सोलापुरातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून अनेक रस्ते आणि शिवारं ओलिचिंब झाली आहेत.

धुळ्यामध्येही पावसानं दमदार हजेरी लावली. काल झालेल्या पावसानं पांझरा नदीला पूर आला. त्यामुळे परिसरातल्या नाल्यांना पूर आला. या पावसामुळे सूरत- नागपूर महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाला.

मान्सूनपूर्व पावसानं राज्यात काही ठिकाणी हजेरी लावली असली तरी, येत्या 48 ते 72 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे.