अकोला : इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असं म्हटलं जातं. त्याबरोबरच कालचक्र पूर्ण होत असल्याचंही आपण ऐकत आलो आहे. परवा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या भेटीनंतर त्यावर परत नव्याने शिक्कामोर्तब झालं आहे. 'सामाजिक एकात्मता' आणि 'अस्पृश्यता निवारणा'च्या कामात छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खांद्याला खांदा लावत सोबत काम केल्याचा इतिहास साक्षी आहे. आता परत शाहू-आंबेडकरांचे वारसदार एका राजकीय विचारांच्या दृष्टीने नव्याने परत एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. परवा, 29 मे रोजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी प्रकाश आंबेडकरांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या दोघांच्या या राजकीय भेटीने राज्याच्या राजकारणात चांगलाच राजकीय धुरळा उडाला आहे. 


सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयानंतर राज्यातील मराठा समाजात सरकारच्या भूमिकेवरून असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला तिढा सुटण्याच्या दृष्टीने संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्यात. मात्र, संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भविष्यात हे दोन्ही नेते सोबत येणार या विचारांना बळ मिळण्याचं कारण म्हणजे भेटीनंतरची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर मोठी स्तुती सूमने उधळलीत. याबरोबरच भविष्यात सोबत काम करण्याचे संकेत देत नव्या राजकीय आघाडीचे सुतोवाचही केले. या भेटीनंतर काय संभाव्य राजकीय घडामोडी होऊ शकतात?. काय राजकीय उलथापालथ राज्याच्या राजकारणात होऊ शकते?  प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीचे राजकीय अन्वयार्थ नेमके काय आहेत?, हे पाहुयात. 


संभाजीराजे भाजपवर नाराज? 


छत्रपती संभाजीराजेंना भाजपने राज्यसभेवर राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदार म्हणून नियुक्त केलं होतं. यानंतर संभाजीराजेंनी राज्यसभेत भाजपचं सहयोगी सदस्यत्व स्वीकारत भाजपशी जवळीक साधली होती. मात्र, अलिकडच्या काळात संभाजी महाराज भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात मराठा आरक्षणावर निर्माण झालेला तिढा आणखी कारणीभूत ठरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून खासदार संभाजीराजेंनी मराठा आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर चर्चेसाठी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. मात्र, अद्यापपर्यंतही हा वेळ मिळाला नसल्याने ते काहीसे नाराज झाले आहेत. यासोबतच भाजपने पक्षात नव्याने आलेल्या मराठा नेत्यांना पक्षात सक्रीय करीत महाराजांना बाजूला ठेवल्याचे चित्र आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या संभाजीराजेंच्या मनात नव्या राजकीय चाचपणीसाठी विचार सुरू आहेत. त्यांना मानणारा एक वर्ग राज्यभरात आहे. शाहू महाराजांचे थेट वंशज, मराठा क्रांती मोर्चातील सक्रीय सहभाग, साधेपणा आणि संयमी नेतृत्व अशी संभाजीराजेंची ओळख राज्यभरात आहे. सध्या भाजपकडून डावललं जात असल्याच्या अस्वस्थेतूनच संभाजीराजेंच्या मनात नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राजकीय सूत्रांतून मिळत आहे. हा नवा पक्ष कदाचित दिवाळीपर्यंत स्थापन होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्यांच्या या संभाव्य राजकीय पक्ष आणि आघाडीचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात


संभाजीराजेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून पवारांना शहर देण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न  


राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. राज्यातील मराठ्यांचं नेतृत्व म्हणून शरद पवारांना राज्य आणि देशपातळीवर ओळख आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या माध्यमातून पवारांच्या नेतृत्वाला सुरूंग लावण्याचे आंबेडकरांचे मनसुबे असू शकतात. त्यातच मराठा समाजात छत्रपती संभाजीराजेंविषयी मोठा आदर आणि सन्मान आहे. त्यातूनच संभाजीराजेंच्या नेतृत्वाला बळ देत त्यांना मराठा समाजाचं नवं नेतृत्व म्हणून स्थिर करण्याचा आंबेडकरांचा मानस असू शकतो. 
 
भुजबळांना सोबत घेत 'फुले-शाहू-आंबेडकर' आघाडीची चाचपणी  


छत्रपती संभाजीराजेंनी नवा पक्ष स्थापन केला, अन या पक्षासोबत आंबेडकरांची आघाडी झाली तर त्याला व्यापकता आणण्यासाठीही दोघांच्या संपर्कातील एक गट कामाला लागला आहे. यातून महाराष्ट्राचं पुरोगामित्वाचे जनक असलेल्या 'फुले-शाहू-आंबेडकरां'च्या वारसा आणि विचारांच्या नेत्यांना एकत्र आणत ही नवी राजकीय आघाडी बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच शाहू-आंबेडकरां'सोबत आता 'फुले' जोडण्याचे प्रयत्न सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आंबेडकर आणि छगन भुजबळांचीही भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीतील नाराज ओबीसी नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्नही आंबेडकरांकडून पुढच्या काळात होऊ शकतो.


यासंदर्भात 'एबीपी माझा'शी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या भाजपसोबतच्या संबंधांवर ठोस निर्णय घेतल्यानंतरच अशाप्रकारच्या चर्चा पुढे नेण्यात अर्थ असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात सध्याच अधिक बोलणं त्यांनी टाळलं आहे. मात्र, यासंदर्भात छगन भुजबळ यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना सावध भूमिका घेतली. ते म्हणालेत की, 'संभाजीराजे नवीन पक्ष काढत असतील तर त्यांना शुभेच्छा. कोणी काय करावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यासाठी ते सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत ते योग्य वाटत असल्याचं भुजबळ म्हणालेत. मात्र, कोणत्याही नव्या आघाडीसाठी कुणाकडूनही माझ्यापर्यंत प्रस्ताव नाही किंवा चर्चा नसल्याचं भुजबळ म्हणालेत. या संभाव्य नव्या आघाडीत तुम्ही जाणार का?, असं विचारल्यावर त्यांनी हात जोडत मौन पाळलं.  


कसं असू शकतं पुढचं राजकीय चित्र?


जर ही नवी आघाडी अस्तित्वात आली तर विधानसभेच्या जागा वाटपाचा एक ढोबळ आराखडाही तयार आहे. संभाजीराजेंसोबत येत्या विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्याचा आंबेडकरांचा मानस असू शकतो. असं झालं तर विधानसभेत आंबेडकर आणि छत्रपती संभाजीराजेंचे पक्ष प्रत्येकी 100 जागा लढू शकतात. तर इतर 88 ठिकाणी मुस्लिमांसह इतरांना सामावून घेतलं जावू शकतं. 


राज्यातील राजकीय घडामोडींकडे दिल्लीचं लक्ष 


महाराष्ट्रातील या सर्व राजकीय घडामोडींकडे काँग्रेससह भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींचं लक्ष लागलेलं आहे. या घडामोडी राज्यातील पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या आहेत. सोबतच या घडामोडी महाविकास आघाडीसह राज्यातील सरकारच्या भवितव्यावरही परिणाम करू शकतात. आंबेडकर आणि संभाजीराजेंच्या पुणे येथे झालेल्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेतील एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले होते की, 'राज्याच्या राजकारणात सध्या त्याच त्या गोष्टींमुळे 'शिळे'पणा आलेला आहे. संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यात 'ताजेपणा' येऊ शकतो. महाराष्ट्र हा 'पुलोद'पासून तर 'महाविकास आघाडी' अशा अचाट राजकीय प्रयोगांची भूमी आहे. त्यामूळे नव्या डावातल्या राजकारणातील हा शिळे'पणा दूर करण्यासाठी त्याला कोणता राजकीय 'तडका' देत 'ताजेपण' आणलं जातं, याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.