मुंबई : प्राज इंडस्ट्रिज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद चौधरी यांनी एबीपी माझाला आज मुलाखत दिली. सुरुवातीला केवळ टेलिफोन आणि टाईपरायटरसोबत स्थापन करण्यात आलेल्या प्राज उद्योग विश्वाचा आज मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. जगातील पाच खंडातील तब्बल 75 देशांमध्ये या कंपनीची उलाढाल आहे. त्याचसोबत मार्केट कॅप साधारण सात कोटींच्या घरात आहे.
1200 ते 1250 कर्मचाऱ्यांचं हे कुटुंब आता आणखी मोठी झेप घेणार आहे. जैवऊर्जा, गुंतागुंतीच्या प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा आणि औद्योगिक सांडपाण्याचं व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये या कंपनीला जागतिक ओळख आहे. या संपूर्ण जीवनप्रवासातील गंमती, धक्के, समोर आलेली संकटं असे सर्व किस्से एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात त्यांनी सांगितले.
पारंपरिक इंधनाला पर्याय म्हणून इथेनॉल उत्पादनावर लक्ष केंद्रीत करत प्राज मॅट्रिक्स विकसित करते. या कामासाठी जागतिक स्तरावर प्राजची नोंद घेतली गेली आहे.
अहमदनगरच्या कोळपेवाडीत प्रमोद चौधरी यांचा जन्म झाला, शालेय शिक्षण झालं, पुढे फलटण आणि त्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर मुंबई IIT मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवीही मिळवली. बजाजसह अनेक नामवंत कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी केली. खेडेगावात शिक्षण झाल्याने याच क्षेत्रासाठी काहीतरी भरीव काम करावं अशी त्यांची इच्छा होती. पुढे आयआयटीमध्ये काम करताना स्वत:चं काहीतरी उभं करावं अशी उमेद मिळत गेली.
भारतातून बरेचसे इंजिनिअर्स परदेशी जातात, मल्टिनॅशनल कंपनीत लागतात पण मला मात्र इथं राहूनच माझं करिअर घडवायचं होतं, असं ते म्हणाले. एक एम्पलॉई बनून न राहता एम्पलॉयर बनावं असं कायम वाटत होतं. माझे आजोबा स्टेशन मास्तर होते, त्यामुळे लहानपणापासूनच इंजिनमास्तर व्हावं असं मला वाटायचं, मात्र पुढे ते स्वप्न आयआयटी इंजिनिअर व्हावं असं वळत गेलं.
इंजिनिअर म्हणजे लॉजिक, कुठला तर्क लावल्याने काय होऊ शकतं याचा योग्य अंदाज किंवा अनुमान लावलं तर तुम्ही कोणत्या ब्रांचमध्ये आहात हे महत्त्वाचं ठरत नाही. तरीसुद्धा मी बारा वर्षे मेकॅनिकल इंडस्ट्रितच काम केलं, असं त्यांनी सांगितलं.
इथेनॉलचं महत्त्व :
ऊसाच्या रसापासून साखर बनवताना मळी (मोलॅसिस) तयार होते. त्या मळीवर प्रक्रिया करून इथेनॉल तयार होते. हा द्रवपदार्थ ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोल डिझेल अशा इंधनात मिसळून करता येऊ शकतो. ब्राझिल देश हा इथेनॉलचा वापर जास्तीत जास्त करण्यात आघाडीवर आहे. तिथे 25 ते 30% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वापरले जाते.
"जो प्रदेश जास्त सुधारलेला नाही, किंवा प्रगत नाही तिथे जास्त स्कोप आहे. त्यामुळे तिथे आधुनिक तंत्रज्ञान आणून विकास करावा हा विचार मनात होता", असं ते म्हणाले. वडील साखर उत्पादनात असल्याने ती इंडस्ट्री जवळून पाहिली होती, त्यामुळे यासाठी काय काय लागू शकतं याची माहिती होती. इथेनॉल लोकांना माहीत नव्हतं असं नाही, दुसऱ्या जागतिक युद्धामध्येदेखील इथेनॉलचा वापर करण्यात आला होता. स्टोव्ह, गाड्या सर्वत्र इथेनॉलचा वापर आपण करत आलो आहोत, त्यामुळे इथेनॉल नव्याने वापरात येतंय असं नव्हे."
इथेनॉलचं भविष्य काय :
इथेनॉल हे मॅजिक प्रॉडक्ट आहे असं प्रमोद चौधरी म्हणाले, याचं कारण त्यांनी सांगितलं ते पुढीलप्रमाणे, कोणताही पदार्थ, शेतीतला भाग जाळून वाया न घालवता त्यातून इथेनॉलची निर्मिती केली जाऊ शकते, याच्या मदतीने केमिकल्स तयार केले जातात. क्लायमेट चेंजच्या संकटावरही मात करण्यासाठी इथेनॉलला भविष्यात आणखी वाव मिळणार आहे. एविएशनसाठी, विमान उड्डाणालाठीदेखील इथेनॉल वापरलं जाऊ शकणार आहे. पॉलिश, औषधं, क्लोरोफॉर्म, कृत्रिम रंग, पारदर्शक साबण, अत्तर व परफ्युम्स आणि अन्य रासायनं बनवण्यातही मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा वापर होतो.
भारताचं स्थान या क्षेत्रात दिवसेंदिवस वर येत चाललं आहे, इतर देशांसोबत तुलना होऊ शकत नाही कारण प्रत्येक देश एक वेगळा प्रयोग करू पाहतोय. ब्राझीलने अल्कोहोलवर काम केलं, अमेरिकेत कॉर्न बेस प्रयोग झाले. भारतात मात्र कॉर्न, ऊस अशा प्रकारे अनेक प्रकारे प्रयोग केले जातायत. अशी माहिती प्रमोद यांनी दिली.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यात साखर उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे या राज्यांमध्ये इथेनॉलची निर्मिती होतेच. मात्र जिल्ह्याजिल्ह्यात इथेनॉलचं उत्पादन घेण्याचे दिवस पाहण्यासाठी भारतात तशा पॉलिसीही आणाव्या लागतील.
आतापर्यंतच्या प्रवासात अनेक मोठे फटके बसले, आर्थिक स्थैर्य नव्हतं, पैसे अडकलेले होते, पण अनेकांनी मदतीचे हात पुढे घेतले आणि धोका पत्करण्याची ताकद मिळाली. कधीच या क्षेत्रात का आलो, किंवा मी इथे अडकलोय अशी भावना मनात आली नाही, असे प्रमोद म्हणाले.
इथेनॉलचा वापर जर जास्त करण्यात आला तर पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता आहे. केवळ पेट्रोलमध्ये मिसळूनच नव्हे तर स्वतंत्रपणेदेखील इथेनॉलचा वापर करण्यावर भर द्यावा यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
नव्या तरुणांनी उद्योगात उतरताना मार्केटिंगवर भर देणं फार महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं. उद्योगासाठी कर्ज घेण्यात हरकत नाही मात्र त्याचं प्रमाण लक्षात घेऊन त्याची जाणीव उद्योजकांनी ठेवायला हवी. यासाठी अंथरूण पाहून पाय पसरावे ही म्हण खरोखर लागू होते असं ते म्हणाले.
प्रमोद चौधरी यांना 2020 सालच्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं, औद्योगिक जैव तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील नाविन्यासाठी त्यांची निवड करण्यात आली, युकेमधील पहिला इथेनॉल प्रकल्पही त्यांना मिळाला. असे अनेक मोठे पुरस्कार मिळवत, आपल्या कामाची सर्वत्र जगभरात त्यांनी छाप पाडली आणि भारताचं, महाराष्ट्राचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं. नक्कीच देशभरातील तरुण त्यांचा आदर्श ठेवून आपल्या जीवनाला चालना देतील.