भिवंडी : थकीत वीज बिल तसेच अवैध वीज कनेक्शनवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर झालेल्या शिवीगाळ व मारहाणीत टोरंट पावरच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी काटई खाडीपार परिसरातील घरत कंपाउंड येथे ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


तुकाराम पवार (वय 55 वर्ष) असं जमावाच्या मारहाण व धक्काबुक्कीत मृत्यू झालेल्या टोरंट पावरच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तुकाराम पवार हे टोरंट पावरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी काटई गावातील घरत कंपाउंड येथे वीज चोरी व थकीत वीज मीटरवर कारवाई करण्यासाठी टोरंट पावरचे कर्मचारी गेले असता येथील स्थानिक नागरिकांनी टोरंटच्या या कारवाईस विरोध केला आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की, मारहाण केली. या मारहाणीत टोरंटचे सुरक्षा रक्षक तुकाराम पवार यांना जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 


दरम्यान मयत तुकाराम पवार यांची मुले आकाश पवार व प्रकाश पवार यांनी दोषींवर कारवाई करावी व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. तसेच टोरंट पावर प्रत्येक कारवाई दरम्यान मोठा पोलीस फाटा घेऊन जात असते, मात्र आजच्या कारवाई वेळी असं कोणतंही पोलीस संरक्षण का घेतलं नाही. त्यामुळे टोरंट पावर देखील या प्रकरणात दोषी असल्याचा आरोप पवार यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे.


तर टोरंट पावर नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत असते. आज झालेली घटना दुर्दैवी असून नागरिकांना जर काही अडचण किंवा शंका असेल तर त्यांनी कार्यालयात यावे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. याप्रकरणी टोरंट पावर तर्फे निजामपुरा पोलीस ठाण्यात टोरंटच्या वतीने मारहाण करणाऱ्या इसमा विरोधात तक्रार करण्यात आली आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर संबंधितांवर पुढील कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती टोरंट पावरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदयानी यांनी दिली आहे.