लातूर : महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. त्यातच सोयाबीनला दहा हजारपेक्षा अधिकचा दर मिळाला आहे. शेतकऱ्यांना कधी नव्हे ते सोयाबीन पिकातून चांगले पैसे मिळणार असल्याची आशा निर्माण झाली असताना एक अफवा पसरली आणि सोयाबीनचे भाव दोन हजारांनी कमी झालेत. याचे परिणाम येणाऱ्या हंगामातील सोयाबीन विक्रीवर होणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


अन् भाव कोसळले
अफवा अक्षरशः होत्याचे नव्हते करू शकते याचे ताजे उदाहरण सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे लक्षात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनचे कमी उत्पादन झाले आहे. त्यातच केंद्रीय पातळीवर डीओसी निर्यातचे धोरण राबविण्यात आल्यामुळे देशात सोयाबीनला चढा भाव मिळाला होता. यामुळे महाराष्ट्रात 28 जिल्ह्यात सोयाबीनचा विक्रमी पेरा करण्यात आला. आजमितीला देशात मध्यप्रदेश सोयाबीन उपादन करण्यात अग्रेसर आहे. मध्यप्रदेशलाही सोयाबीन उत्पादनात मागे टाकण्याची तयारीत महाराष्ट्र आहे. अशी आशादायक स्थिती असताना केंद्र सरकार 15 लाख टन डीओसी आयात करणार असल्याची माहिती सोशल मीडियावर फिरू लागली. त्याची कोणत्याही प्रकारे खातरजमा न करता काही माध्यमात बातम्याही लागल्या. याचा थेट परिणाम सोयाबीनच्या बाजारभावावर झाला आहे . अवघ्या तीन दिवसात सोयाबीनचा भाव 2 हजार रुपयांनी घटला. मात्र, ही अफवा आहे, असे लक्षात आल्याबर भाव वाढत आहे. हजार रुपयेपर्यंत भाव वाढला आहे. मात्र, स्थिती पूर्वपदावर येताना दिसत नाही.


पुढील तीस दिवसात बाजारात नवीन सोयाबीनची आवक येणार 
पुढील तीस दिवसात बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू होईल. त्यावेळी अधिक प्रमाणात माल आल्यास भावावर परिणाम होणार आहे. त्यात सरकारचे धोरण बदलले तर बाजार पार मोडून पडणार आहे. याचा थेट परिणाम सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. 10 हजार भाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. अपेक्षित भाव नाही मिळाल्यास शेतकरी हवालदिल होतील. आपल्या देशाची सोयाबीन पेंडीची गरज ही 50 लाख टनाच्या आसपास आहे. उत्पादन 82 लाख टन इतके होते. देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारमूल्य मिळावे म्हणून सरकारने डीओसी निर्यात करण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र, पोल्ट्री व्यवसायिकांना याचा आर्थिक फटका बसल्यामुळे त्यांनी डीओसी आयात करण्याबाबत सरकारला निवेदने दिली आहेत. जर आता 15 लाख टन सोयाबीन पेंड आयात करण्याचा निर्णय घेतला तर आपल्याकडील शिल्लक राहणाऱ्या 47 लाख टन सोयाबीन पेंडीचे करायचे काय, याचा निर्णय सरकारला करावा लागेल. यामुळे सोयाबीनच्या बाजार भावावर थेट परिणाम होणार आहे.


सरकारने आताच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय बाजाराचा विचार करत शेतकरी हित नाही जोपासले तर सोयाबीनमधून उत्त्पन्न कमावू असा विचार करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे. एक अफवा आली आणि बाजार भाव पडला आहे. तीन दिवसात दोन हजारांनी भाव पडले. आज एक हजारांनी भाव वाढले आहेत. मात्र, स्थिती पूर्वपदावर येण्यास किती कालावधी लागेल माहीत नाही. सरकारचे डीओसी बाबतचे धोरण काय आहे यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आहे. कधी नव्हे ते सोयाबीनला भाव मिळाला आहे. तो सरकारच्या धोरणावर टिकणार आहे. नाहीतर शेतकऱ्यांच्या अनेक वर्ष आर्थिक फटका खाण्याच्या प्रकार पुन्हा पहावयास मिळले, असे मत किसान मित्र ग्रुपचे संचालक हेमंत वैद्य यांनी व्यक्त केले आहे.