Majha Maharashtra Majha Vision 2021 : आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो, असं बाबा रामदेव म्हणाले. तसेच अद्यापही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. अनेक गोष्टींसाठी युरोपातील कंपन्यांवर निर्भर आहोत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे, असंही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.  


धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ : बाबा रामदेव 


"आपण जिथून प्रवास सुरु केला, शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र, संशोधनात आणि समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कोणतंही राष्ट्र पुढे जातं, तेव्हा गोष्ट एका तत्वाची नसते, तर समाजजीवनाच्या सर्व तत्वांचा सर्वसमावेशी, सर्वांगीण विकास होतो. सर्वस्पर्शी विकास होतो. तेव्हा आपण म्हणू शकतो की, आपण आपल्या शहीदांची स्वप्न पूर्ण केली आहेत. तसेच हे पूर्ण करण्यासाठी आपण यशस्वी झालो आहोत. आपण सामाजिक, राजकीय, धार्मिक जीवनात जे आपले मूळ सिंद्धांत आहेत, ते भारतात धर्मनिरपेक्षता, समानता, सहिष्णूता, सद्भावना आणि एकात्मकेतनं आपण पुढे जाऊ. पुढे जाऊन अनेक गोष्टी करायच्या आहेत. या प्रवासाला अंत नाही.", असं योगगुरु रामदेव बाबा म्हणाले. 


"शेतीसाठी आपल्याला अद्यापही बाहेरच्या देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं. डाळींबाबत सध्या 50 टक्के प्रमाण कमी झालंय. तेलांच्या बाबतीत अद्यापही आपण बाहेरच्या देशांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहोत. देशातील सर्व नागरिकांना पौष्टीक आहार मिळावा, देश आत्मनिर्भर व्हावा. अद्यापही अनेक गोष्टींसाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. अनेक गोष्टींसाठी युरोपातील कंपन्यांवर निर्भर आहोत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. आतापर्यंत आपण अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. तसेच अनेक क्षेत्रांत आपल्याला प्रगती करणं गरजेचं आहे. 50 लाख कोटींपासून शंभर लाखांपर्यंतच्या अर्थव्यवस्थेवर विदेशी कंपन्यांचा कब्जा आहे.", असं बाबा रामदेव म्हणाले. 


जातीपात, प्रांत, भाषा, धर्म या भेदभावातून देशाला मुक्त झालेलं पाहायचंय : बाबा रामदेव


बाबा रामदेव म्हणाले की, "मी लहानपणापासूनच या गोष्टीसाठी खूप आग्रही होतो. इंग्रजांनी आपल्या देशाची खूप लूट केली. त्यामुळे माझ्या मनात अद्यापही आक्रोश आहे. वैर नाही, पण माझ्यात एक झंझावात आहे. एक वीरता, पराक्रम, स्वाभिमानाची भाव चेतना आहे. त्यांनी आपल्यावर आक्रमणं केली. आपण राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालोय, पण आर्थिक, सांस्कृतीक, वैचारिक गुलामगिरीतून भारत कधी मुक्त होणार? हा प्रश्न माझ्या मनात नेहमीच असतो. दुसरा माझ्या मनात भाव असतो की, मी लहानपणापासून पाहिलं होतं की, जातीपातीचा भेदभाव, प्रांतिय भेदभाव, भाषेत भेदभाव, मला या सर्व गोष्टींतून भारताला मुक्त झालेलं पाहायचंय."


"सध्या देशात आयडॉलॉजिकल दहशतवाद सुरु आहे. देशाला तोडण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. कोणी ओबीसींच्या नावावर, तर कोणी एसटी एससीच्या नावानं, तर कोणी धर्मांच्या नावानं, तर कोणी वेगवेगळ्या प्रांत आणि भाषांच्या नावानं हे मला पटतंच नाही. मला असं वाटतं की, एक अखंड भारत, ज्याचा पाया सरदार वल्लभभाई पटेल यांनी रचला आणि ज्या अखंड भारताचं स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यासाठी संघर्ष केला महाराण प्रताप यांनी, या साऱ्यांचं बलिदान आपण विसरलो नाही पाहिजे आणि कोणत्याही परिस्थिती देशाला वेगळं करु दिलं नाही पाहिजे.", असं बाबा रामदेव म्हणाले. 


दिवसभर दिग्गज नेत्यांकडून महाराष्ट्राचं व्हिजन फक्त एबीपी माझावर 


राज्यातील ठाकरे सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात बरेच बदल देखील नुकतेच झाले आहेत. देशाचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात देशासह राज्यात अनेक समस्या आहेत. राज्याचं बोलायचं झालं तर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, MPSC अशा अनेक मुद्द्यांसह, पूर, कोरोना अशी संकटं अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमिवर एबीपी माझातर्फे आज 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात यानिमित्ताने महाराष्ट्रातील गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामाचा आढावा आणि महाराष्ट्राच्या भविताव्याविषयीचं सरकारच्या धोरणांबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री सुभाष देसाई या नेत्यांसह बाबा रामदेव, अभिनेते सचिन पिळगावकर, खेळाडू अंजली भागवत, उद्योजक अरुण फिरोदिया, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या आपलं व्हिजन मांडणार आहेत.  


'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' हा कार्यक्रम आज सकाळी 9 वाजल्यापासून एबीपी माझावर पाहता येणार आहे. एबीपी माझाच्या अधिकृत यू-ट्यूब चॅनल, फेसबुक पेज, ट्विटर हॅण्डल आणि हॉटस्टारवर नेटीझन्सना हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येणार आहे.


एबीपी माझा युट्यूब लाईव्ह : https://www.youtube.com/watch?v=I6zGBF72o7M 
फेसबुक पेज : https://www.facebook.com/abpmajha 
ट्विटर हँडल : https://twitter.com/abpmajhatv