Ashok Chavan : दरवर्षी 19 जूनला जगभरात फादर्स डे साजरा केला जातो. वडिलांना स्पेशल फिल करुन देणारा हा दिवस तरुणाई आवडीनं साजरा करताना दिसते. या फादर्स डे' चं औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील 'जलनायक' या माहितीपटाचे लवकरच लोकार्पण होणार आहे. याबाबतची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी 'फादर्स डे'चे औचित्य साधून महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यांचे वडील, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी उजाड व ओसाड मराठवाड्याला सुजलाम सुफलाम केलं. त्यामुळं त्यांना जलनायक, जलपुरुष असं म्हटलं जातं. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर आधारित माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. या माहितीपटात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनातील घडामोडींची गुंफण करण्यात आली आहे.
2020-21 हे वर्ष जलक्रांतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. या वर्षाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान आणि चित्रायण एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने
'जलनायक डॉ. शंकरराव चव्हाण' या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. त्यातून त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या माहितीपटाचे दिग्दर्शन युवा प्रतिभाशाली दिग्दर्शक अजिंक्य म्हाडगुत यांनी केलं आहे. तर या महितीपटाच्या सहनिर्मात्या अशोक चव्हाण यांच्या कन्या सुजया व श्रीजया या दोघी आहेत.
विविध प्रकल्प सिद्धीस नेण्यासाठी शंकरराव चव्हाण यांनी जे भगीरथ प्रयत्न केले, त्यामुळं त्यांना 'आधुनिक भगीरथ' म्हणून ओळखले जातं. महाराष्ट्राच्या 'जलसंस्कृतीचे जनक' असाही शंकररावजींचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो, तो अगदी यथार्थ आहे. पैठणचा जायकवाडी प्रकल्प होऊ नये, यासाठी विरोधकांनी अगदी रान पेटवले होते. त्यांचा विरोध पत्करून शंकररावजींनी 'नाथसागर' साकार केला. परिसरातील शेतीला पाणीपुरवठा करण्याबरोबरच औरंगाबाद शहराला पिण्याचे पाणी आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही पाणी याच नाथसागरातून पुरवले जाते.