Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. विधानपरिषदेची निवडणूक उद्या पार पडणार आहे. त्यामुळं प्रत्येक पक्ष आपापल्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांनी रणनीती आखली आहे.
बैठकीत मतांचा कोटा वाढवून घेण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही
राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या दोन उमेदवारांसाठी खास रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीकडे सध्या 51 आमदार आहेत. राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या संजयमामा शिंदे, देवेंद्र भुयार आणि श्यामसुंदर शिंदे यांच्या मदतीने राष्ट्रवादी दुसरी जागा सहजत्या निवडून आणेल. मात्र गुप्त मतदान पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे मत फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत मतांचा कोटा वाढवून घेण्याबाबत राष्ट्रवादी मागणी करेल. याचंसाठी शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांवर डोळा असल्याची चर्चा आहे.
आमदार आणि अपक्ष आमदार यांच्याशी वन टू वन बातचीत
राज्यसभेला अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांनी मते फोडली असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. असा आरोप पुन्हा होण्याची कोणतीही शक्यता नको यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज दुपारी 2 नंतर राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदार आणि अपक्ष आमदार यांच्याशी वन टू वन बातचीत करणार आहेत. यामध्ये आमदारांना मतदान कसं करावं आणि कुणाला करावं याबाबात माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच संबंधित आमदारांची नेमकी अडचण काय आहे? मतदार संघातील प्रलंबित प्रश्न याबाबात चर्चा करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कसं करावं याबाबत मार्गदर्शन
शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत बाद झाल्यानंतर आता अशा प्रकारची कोणतीच चूक होऊ नये यासाठी आजचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मतदान कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं जाईल. त्याबाबतची रंगीत तालीम देखील पार पडेल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत प्रेप्रन्शियल व्होट बाबत चर्चा होईल आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाचे नेते याबाबात आपल्या आमदारांना माहिती देतील.