खैरनार यांना चंदीगडमध्ये जवानांनी सकाळी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांचं पार्थिव 9 वाजेपर्यंत ओझरला पोहोचेल, मग नंदुरबारमधील त्यांच्या मूळगावी बोराळेला रवाना होईल.
महत्त्वाचं म्हणजे मिलिंद हे मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या एनएसजी कमांडोच्या पथकात होते.
मिलिंद हे डिसेंबर 2002 मध्ये हवाई दलात कमांडो म्हणून रुजू झाले होते, सध्या ते लष्कराच्या तुकडीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आलं.
काश्मीरमध्ये शहीद
काश्मीरमधील बांदिपोरामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. मात्र दहशतवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दोन जवान शहीद झालेत. त्यात महाराष्ट्रातल्या नंदुरबारच्या सुपुत्राचा समावेश आहे. मिलिंद किशोर खैरनार असं या वीरपुत्राचं नाव आहे.
बांदिपोरामधील हाजिन भागात पहाटे पावणे पाचपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला.
दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. यावेळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले. हे दोन्ही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे होते.
मुलगा शहीद झाल्याचा अभिमान
दरम्यान, मुलगा शहिद झाला याचा अभिमान आहे असं सांगताना शहीद मिलिंद खैरनार यांचे वडील आणि भावाला अश्रू अनावर झाले. वीरपुत्र मिलिंदच्या आठवणी त्यांनी एबीपी माझावर जागवल्या.
26/11च्या मुंबई हल्ल्यावेळी एनएसजी कमांडो असलेल्या मिलिंद यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं होतं. हवाई दलाचा कमांडो असलेल्या मिलिंदच्या आठवणी सांगताना कुटुंबियांना गहिवरुन आलं.
मिलिंद खैरनार यांचे वडील धुळे जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीतून निवृत झाले आहेत. नोकरीनिमित्त त्यांचे वडीव धुळ्यात असल्याने शहीद मिलिंद यांचे शिक्षणही धुळ्यातील एस. एस. व्ही. पी. एस. विद्यालयात झाले.
मिलिंद यांचे बंधू मनोज हे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत.
मिलिंद खैरनार यांची ओळख
-मिलिंद किशोर खैरनार
-जन्म - १७ फेब्रुवारी १९८४
-एअर फोर्स कमांडो
-पश्चात – पत्नी, 2 लहान मुलं (वेदीका इयत्ता तिसरीत शिकते, एक वर्षाचा मुलगा कृष्णा)
-मूळगाव – बोराळे (जि.नंदुरबार)
-शिक्षण – धुळे जिल्ह्यातील साक्री इथल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये
-महाविद्यालयीन शिक्षण – एस.एस.व्ही.पी.एस. क़ॉलेज
-2002 ला एअरफोर्समध्ये कमांडो म्हणून रुजू
-वयाच्या 34 व्या वर्षी उत्तर कश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद.
- पश्चात मुंबई पोलीसात कार्यरत असलेला भाऊ मनोज, निवृत्त झालेले वृध्द वडील आणि आई असा परिवार आहे.